
मुंबई: केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुणे आणि मुंबईतून चालवल्या जात असलेल्या एका आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून डिजिटल उपकरणं, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
CBI च्या माहितीनुसार, हे रॅकेट प्रामुख्याने अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत होतं. आरोपी अमेरिकेतील अंतर्गत महसूल सेवा (IRS), यू.एस. नागरिकत्व व स्थलांतर सेवा (USCIS), तसेच भारतीय राजनैतिक मिशनचे बनावट अधिकारी असल्याचा बनाव करून फसवणूक करत होते. फसवणुकीत पीडितांना कायदेशीर कारवाईची भीती दाखवून गिफ्ट कार्ड्स किंवा क्रिप्टोकरन्सीद्वारे 500 ते 3,000 डॉलरपर्यंतची रक्कम वसूल केली जात होती.
या बेकायदेशीर कृती जानेवारी 2025 पासून सुरू असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील एका बेकायदेशीर कॉल सेंटरमधून VoIP कॉल्सद्वारे ही फसवणूक केली जात होती. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हवाला मार्गे देश-विदेशातून रोख रक्कम दिली जात होती. सुमारे 3 ते 4 कोटी रुपयांचा मासिक गैरव्यवहार या रॅकेटमधून होत असल्याचा संशय आहे.
CBI ने 24 जुलै रोजी अनामित बँक अधिकारी व चार खासगी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यावरून पुणे व मुंबईतील सात ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये 27 मोबाईल फोन्स, 17 लॅपटॉप्स, तसेच अन्य अनेक डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली. या फसवणुकीत काही बँक अधिकाऱ्यांनी बनावट KYC दस्तऐवजांवर खाती उघडण्यासाठी मदत केल्याचा संशय आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होत आहे.
तपासादरम्यान एका आरोपीच्या घरातून1.60 लाख रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम व 150 ग्रॅम अंमली पदार्थ सापडले. तर दुसऱ्या आरोपीकडे 9.60 लाखांची रोख रक्कम मिळाली. एका आरोपीच्या क्रिप्टो वॉलेटमध्ये 6.94 लाख रुपये मूल्यातील क्रिप्टोकरन्सी सापडली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना मुंबईतील विशेष CBI न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, त्यांना 30 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world