Mumbai Crime : मुंबईतील एका व्यावसायिकाला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 53.30 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिला ठगाने डेटिंग ॲपच्या माध्यमातून या व्यावसायिकाशी जवळीक साधली आणि त्यानंतर गुंतवणुकीच्या नावाखाली ही मोठी फसवणूक केली.
स्वतःचे नाव प्रियंका गुप्ता सांगणाऱ्या या महिलेने अतिशय चलाखीने व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला आणि त्याला आर्थिक जाळ्यात ओढले. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत असून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डेटिंग ॲपवरून झाली ओळख
या प्रकरणातील तक्रारदार व्यावसायिकाने लग्नाच्या इच्छेने एका प्रसिद्ध डेटिंग ॲपवर आपले खाते उघडले होते. तिथे त्याची ओळख जुहू परिसरात राहणाऱ्या प्रियंका गुप्ता नावाच्या महिलेशी झाली.
दोघांमध्ये संवाद वाढल्यानंतर या महिलेने सांगितले की, ती तिच्या पतीपासून वेगळी राहते आणि तिला 6 वर्षांची एक मुलगी आहे. हळूहळू या संवादाचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यांनी व्हॉट्सॲपवर बोलण्यास सुरुवात केली. एकमेकांवर विश्वास वाढल्यानंतर त्यांनी भविष्यात लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला होता.
( नक्की वाचा : Pune News : शाळेच्या वॉशरुमध्ये मैत्रिणीला गाठलं.. तर शिक्षिकेला केले प्रपोज, विद्यार्थिनीच्या प्रतापाने पुणे हादरले )
मार्केट एक्सेस कंपनी आणि गुंतवणुकीचे आमिष
13 ऑक्टोबर रोजी या महिलेने आपली खरी चाल खेळण्यास सुरुवात केली. तिने व्यावसायिकाला सांगितले की, ती मार्केट एक्सेस कंपनी नावाच्या फर्मच्या माध्यमातून सोन्याच्या व्यापारात (Gold Trading) गुंतवणूक करते. यामध्ये खूप चांगला नफा मिळत असल्याचे सांगून तिने व्यावसायिकाला देखील त्यात पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले.
आपल्या होणाऱ्या पत्नीवर विश्वास ठेवून व्यावसायिकाने या योजनेत गुंतवणूक करण्यास होकार दिला. त्यानंतर संबंधित महिलेने त्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर व्यावसायिकाचे एक बनावट खाते तयार करून दिले.
( नक्की वाचा : Trending News : पाळीव कुत्रा आजारी असल्याने दोन बहिणी नैराश्यात, टोकाच्या निर्णयाने कुटुंब उद्ध्वस्त )
53 लाखांची गुंतवणूक आणि परताव्याचा बनाव
तक्रारदार व्यावसायिकाने विश्वासाने वेळोवेळी एकूण 53.30 लाख रुपये या खात्यात जमा केले. काही दिवसांनंतर त्याला त्याच्या ऑनलाइन खात्यावर ही रक्कम वाढून 1.08 कोटी रुपये झाल्याचे दिसू लागले. आपली रक्कम दुप्पट झाल्याचे पाहून व्यावसायिकाला आनंद झाला.
मात्र, जेव्हा त्याने यातील काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. त्याने कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता, त्यांनी रक्कम काढण्यापूर्वी एकूण रकमेच्या 30 टक्के रक्कम टॅक्स किंवा फी म्हणून जमा करण्यास सांगितले.
फसवणूक झाल्याचे आले लक्षात
व्यावसायिकाकडे पुन्हा मोठी रक्कम जमा करण्यासाठी पैसे उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्याने आपली मूळ गुंतवणूक केलेली रक्कम तरी परत मिळावी अशी विनंती केली. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवला आहे. सायबर पोलीस आता या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.