कायद्याचे रक्षकच जर तोच कायदा पायदळी तुडवत असतील तर? असंच काहीसं घडलं आहे. चक्क एका महिला वकीलाने आपल्याच क्लायंटला फसवल्याची घटना समोर आली आहे. या वकील महिलेने घटस्फोटात तडजोड करून देते असं सांगत आपल्या क्लायंटला तब्बल 15 लाखांचा गंडा घातला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत संबंधीत क्लायंटने तक्रारही दाखल केली आहे. जवळपास नऊ महिने हा क्लायंट अंधारात होता. पण ज्यावेळी सत्य समोर आले त्यावेळी त्याच्या पायाखालची वाळू सरकली. घटस्फोट बाजूला राहीला आता त्याला नव्या लढ्यालाच त्यामुळे सामोरे जावं लागत आहे.
बहार सुर्यवंशी असं या क्लायंटचं नाव आहे. तो दादरमध्ये राहातो. तो आपल्या पत्नीपासून विभक्त राहातो. दोघांच्याही घटस्फोटाची केस सुरू आहे. या केससाठी त्याने नम्रता दरवेश यांना आपले वकील म्हणून नियुक्त केलं होतं. या नम्रता कुर्ला इथं राहातात. तर त्याचं कार्यालय हे सायन इथं आहे. नम्रता यांनी बहार यांना आपण घटस्फोटात तडजोड करू. तुमची पत्नी 15 लाखात घटस्फोट देण्यास तयार झाली आहे. त्यामुळे वेळ घालवू नका. तडजोडीचे 15 लाख रूपये माझ्या खात्यात जमा करा असे वकील असलेल्या नम्रता यांनी सांगितल्याचे बहार यांनी सांगितले.
घटस्फोट होत आहे. शिवाय पत्नीचे मन बदलण्याच्या आत पैसे द्या असं ही नम्रता यांनी सांगितल्यामुळे बहार यांनीही 15 लाख देण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी कोणतीच चौकशी केली नाही. आईचे दागिने विकून त्यांनी 15 लाख रूपये नम्रता यांच्या बँक खात्यात जमा केले. घटस्फोटाची प्रक्रीया ही ऑनलाईन होईल असं ही बहार यांना सांगितलं गेलं. पैसे दिल्यानंतर नऊ महिने झाले तरी घटस्फोट काही झाला नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या मित्राकडे याबाबत विचारपूस केली. त्यावर पैसे वकीलांना नाही तर कोर्टात द्यावे लागतात असं त्याला सांगितलं.
शिवाय कोर्टात हजरही रहावं लागतं असं त्यांना सांगण्यात आलं. अशा स्थिती पुन्हा बहार यांनी नम्रता दरवेश यांच्याकडे याबाबत विचारणा केली. त्यांनी घटस्फोट होणार आहे. सर्व काही झालं आहे. मुलीच्या कास्ट प्रमाणपत्रामुळे अडकलं आहे असं सांगितलं. त्यावर तुम्ही पैसे दिलेत याची काही रिसीट वैगरे आहे का त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. शिवाय बहार यांनी आपल्या पत्नीच्या वकीला सोबतही चर्चा केली. तुम्हाला पैसे दिलेत का अशी विचारणा केली. त्यावर आपल्याला कुठलेच पैसे मिळाले नाहीत असं त्यांनी सांगितलं. त्यावर आपली फसवणूक झाली असल्याचं बहार यांना समजलं. त्याचा जाब त्यांनी नम्रता यांना विचारला. आईचे दागिने विकून पैसे दिल्याचेही नम्रता यांना माहित होतं असं बहार सांगतात.
नक्की वाचा - Nashik News: घरांना हादरे बसले, काचा फुटल्या; नाशिककरांमध्ये घबराट, नेमकं काय घडलं?
नम्रता यांनी तुमचे पैसे मी घेवून पळणार आहे का असं त्यांना सांगितल्याचं ही बहार म्हणाले. तर त्यांच्या पतीनेही बहार यांच्यावर वाईट आरोप केल्याचं ते म्हणतात. या संपूर्ण प्रकरणात बहार यांनी नम्रता यांच्या विरोधात दादर पोलिसात तक्रार दिली आहे. शिवाय बार काऊंसीलकडे ही तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. माझी फसवणूक झाली. दुसऱ्यांची होवू नये असं ते म्हणाले. ज्यांच्यावर कायदा पाळण्याची जबाबदारी असते तेच कायदा मोडत आहेत, असा आरोप बहार यांनी केला आहे. बहार यांच्यावर ओढवलेला हा प्रसंगाचा त्यांनी व्हिडीओ केला आहे. तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.