मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागानं ही कारवाई केली आहे. वैभव पांड्या असं अटक करण्यात आलेल्या हार्दिकच्या भावाचं नाव आहे. हार्दिकसह कृणाल पांड्याची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
हार्दिक आणि कृणाल यांनी 2021 मध्ये वैभवसह पॉलिमर व्यवसाय सुरु केला होता. या व्यवसायात हार्दिक आणि कृणाल यांची प्रत्येकी 40-40 टक्के तर वैभवची 20 टक्के भागिदारी होती. पार्टनरशिपच्या नियमानुसार कंपनीला होणारा फायदा भागिदारीच्या आधारा विभागला जाणार होता. पण, वैभवनं कंपनीचा नफा त्याच्या भावाला देण्याऐवजी नवी कंपनी सुरु केली आणि त्यामध्ये हा पैसा वळवला. या कारणांमुळे हार्दिक आणि कृणालला 4.3 कोटींचा तोटा झाला. या प्रकरणात हार्दिकनं केलेल्या तक्रारीनुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं वैभवला अटक केली आहे.
हार्दिक पांड्याला वन-डे वर्ल्ड कपच्या दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला वर्ल्ड कप अर्ध्यातून सोडावा लागला होता. त्यानंतर तो मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून यंदाचा आयपीएल खेळतोय. या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. त्यांनी पहिले तीन सामने गमावले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत पॉईंट्स टेबलमध्ये खातं उघडलं आहे. हार्दिकचा भाऊ कृणाल लखनौ सुपर जायंट्सकडून खेळतोय. लखनौनं आत्तापर्यंत झालेल्या 4 पैकी 3 सामने जिंकले असून 1 गमावला आहे.