संजय तिवारी
सोशल मीडियावर प्रेम करणे किती महागात पडू शकते याचे उत्तम उदाहरण नागपूरात समोर आले आहे. इथं एक 55 वर्षाच्या महिलेची एका तरुणाबरोबर ओळख झाली. आपण अमेरिकन नागरिक असल्याचे त्यांने त्या महिलेला सांगितलं. त्यावर तिने विश्वासही ठेवला. पुढे बोलणं वाढलं आणि दोघांमध्ये प्रेमही वाढलं. मात्र पुढे काय होणार आहे याची यत्किंचीत ही कल्पना तिला नव्हती. ती आंधळ्या प्रेमात होती. त्यात अमेरिनक बॉयफ्रेंड त्यामुळे तिला आपल्याबरोबर काय घडतय हेच समजत नव्हतं. पण पुढे तिच्या बरोबर जे काही झालं त्यामुळे तिला मानसिक धक्काच बसला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्या तरुणाने आपण अमेरिकन नागरिक असल्याचे या महिलेला सांगितले. शिवाय आपण प्रचंड श्रीमंत असल्याची बतावणी ही त्याने मारली होती. पुढे तो तिचा बॉयफ्रेंडही झाला. त्या 55 वर्षीय महिलेचा त्याने विश्वास ही संपादीत केला. हे सर्व ऑनलाईन होत होतं. त्यानंतर तिच्याशी भावनिक जवळीक ही निर्माण केली. महिलेच्या सोशल मीडिया प्रोफाईलचे कौतुक केले. भावनिक संबंध जोडत तिला हळूहळू प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी निर्माण झालेले नाजूक भावनिक संबंध असल्याचे त्याने भासवल्याने सदर महिला त्याच्या जाळ्यात अडकत गेली.
मग तिला एक मोठे गिफ्ट देण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. तिला त्या कथित गिफ्ट पॅकेजचे फोटो त्याने पाठवले. त्यात महागडे नेकलेस देखील होते. त्या गिफ्ट पॅकेजचे खोटे फोटो आणि कुरिअर ट्रेकिंगचे खोटे रेकॉर्ड तयार करून महिलेला पाठवले. ते गिफ्ट भारतात पोहोचल्यावर तो ही भारतात तिच्याजवळ येणार होता. महिला त्याच्यावर विश्वास ठेवत गेली. मग महिलेला सदर गिफ्ट पॅकेज कस्टम्समध्ये अडकल्याचे संदेश मिळू लागले.
त्याला सोडविण्यासाठी कस्टम ड्यूटी, जीएसटी, अन्य करांचा भरणा करायचा असल्याचे तिला सांगण्यात आले. त्या सर्वावर विश्वास ठेवत सदर महिलेने त्याला वेगवेगळ्या वेळी एकूण सोळा लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र, नंतर संशय वाढल्याने त्या महिलेने नागपूर सायबर पोलिस ठाण्यात संपर्क केला. पुढील तपासात ते बँक अकाउंट एनआरआय अकाऊंट असून दुबई येथून ते पैसे काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. हे पैसे बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या ओव्हरसीज अकाउंट्स द्वारे काढण्यात आले. सायबर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अकाऊंट ब्लॉक केल्याने पाठवण्यात आलेल्या रकमेचा एक भाग वाचला आहे. तो महिलेला परत मिळाला आहे. या घटनेनं ही महिला हदरून गेली आहे.