नागपूर: दारु आरोग्यासाठी जितकी हानीकारक असते तितकीच ती कौटुंबिक व्यवस्थाही उध्वस्त करु शकते. दारुमुळे अनेकांचे संसार मोडल्याच्या घटना ऐकायला मिळतात. नागपूरमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांचा दारुमुळे जीव गेल्याने रागाच्या भरात मुलाने बार- आणि वाईन शॉपमध्ये चोरीचा सपाटा लावल्याचा प्रकार नागपूरमध्ये घडला.
समोर आलेल्या माहितीनुसार, दारूच्या व्यसनामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संतापातून बार आणि वाईन शॉपमध्ये चोरी करणारा युवक चोर बनला असून, त्याला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. राजा खान उर्फ राजा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा दारूच्या अति सेवनामुळे मृत्यू झाला होता,त्यामुळे बार आणि वाईन शॉप चालकांविरोधात त्याच्या मनात तीव्र राग होता.
ड्रायव्हरची आत्महत्या, भाजप खासदाराविरोधात गुन्हा दाखल; सुसाईड नोटमधून धक्कादायक आरोप
त्यातूनच त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत शहरातील ८ दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली आहे. मात्र, चोरीच्या पैशातून गांजाचे व्यसन करत असल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे. 31 जुलै रोजी राणी दुर्गावती चौकातील 'मयुरी सावजी बार'मध्ये चोरी करून रोख 36 हजार रुपये आणि सिगारेटच्या पाकिटांसह एकूण 40 हजारांचा ऐवज चोरल्याची घटना घडली होती.
दरम्यान, बारचे मालक निलेश देवानी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपीला ओळखून अटक केली. त्याने गुन्ह्यांची कबुली दिली असून, आणखी चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
(नक्की वाचा- Supriya Sule: उद्धव ठाकरे दिल्लीत आणि सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट! कारण काय?)