मनोज सातवी, प्रतिनिधी
अजय देवगनची मुख्य भूमिका असलेला दृश्यम हा हिंदी चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे. त्यामध्ये अजय कुणाला संशय येऊ नये म्हणून मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये पुरतो असे दाखवण्यात आले आहे. दृश्यममधील पटकथेपासून प्रेरणा घेत प्रत्यक्ष आयुष्यातही या प्रकारच्या हत्या होत आहेत.
मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नालासोपाऱ्यात पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली. त्यानंतर कुणालाही याचा सुगावा लागू नये म्हणून त्यांनी घरामध्येच पतीचा मृतदेह गाडला होता. पण, अखेर या हत्येचा उलगडा झाला आहे.
काय आहे प्रकरण?
लासोपारा पूर्वेच्या गडगापाडा परिसरातील विजय चव्हाण (35) हा त्याची पत्नी कोमल चव्हाण (28) सोबत रहात होता. विजय मागील 15 दिवसांपासून तो बेपत्ता होता. विजय चव्हाणचे दोन भाऊ त्याचा शोध घेत होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कोमल चव्हाण देखील बेपत्ता झाली होती. तिच्यापाठोपाठ शेजारी राहणारा मोनू शर्मा हा तरुणही बेपत्ता झाला.
( नक्की वाचा : नवऱ्याने गळा आवळला, पोटात लाथा मारल्या, भारतीय महिलेच्या UAE मध्ये आढळला मृतदेह! )
कोमल चव्हाण आणि मोनू शर्मा यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यातून ते दोघे पळून गेल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, आज सकाळी (सोमवार, 21 जुलै) चव्हाण यांचे दोन भाऊ गडगापाडा येथील ओम साई या निवासस्थानी आले असता घरातील टाईल्सचे रंग वेगळे दिसून आले. त्यांनी टाईल्स काढली असता त्यांना बनियान दिसला आणि दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. सध्या पेल्हार पोलीस घटनास्थळी असून लाद्या काढून मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. फॉरेन्सिक टिम घटनास्थळावर पोहोचली आहे. पोलिसांकडून दोन्ही आरोपींचा शोध सुरु आहे.