मनोज सातवी
पोलिस हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करतात. जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच असते. त्यामुळे ते वेळ काळ न पाहात जनतेच्या सेवेसाठी तैनात असतात. पण सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यात पोलिसांनाच संरक्षणाची गरज आहे की काय असा प्रश्न पडतो. या व्हिडीओमध्ये दोन ट्रॅफिक पोलिस हवालदारांना भर रस्त्यात पाडून पाडून मारलं जात आहे. हा व्हिडीओ नालासोपाऱ्याचा असल्याचं समोर आलं आहे.
नालासोपाराच्या प्रगती नगरात ही घटना घडली आहे. येथे दोन वाहतूक पोलिस कर्तव्यावर होते. त्यावेळी एका मुलाला त्या ट्रॅफिक पोलिसांनी अडवले. त्याच्याकडे त्यांनी लायसन्सची विचारणा केली. पण त्याने ते दिले नाही. त्याच वेळी त्या मुलाने त्याच्या वडीलांना तिथे बोलावले. वडील आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या वडीलांकडे लायसन्सबाबत विचारणा केली. याचा राग त्या मुलाच्या वडीलांना आला. त्यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली.
बाचाबाची इतकी वाढली की दोघांनीही एकमेकांवर हात टाकला. दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. वडील आणि पोलिसात मारामारी होत आहे हे पाहिल्यानंतर त्या मुलालानेही लाथा बुक्क्यांनी ट्रॅफीक पोलिसाला मारायला सुरूवात केली. पोलिसाला रस्त्यावर पाडून बाप लेकाने मारमार मारले. त्यात दुसरा पोलिस हवालदार ही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यांचं कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते त्या पोलिसाला कपड्या प्रमाणे धूधु धुत होते.
नक्की वाचा - Viral: नोकरी गेली तरीही घरबसल्या दर महिना दीड लाखांची कमाई, हे कसं शक्य आहे ?
ही सर्व घटना होत होती त्यावेळी बघ्यांची मोठी गर्दी त्या ठिकाणी झाली होती. त्या पैकीच एकाने या हाणामारीचा व्हिडीओ काढला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल ही झाला. मंगेश नारकर आणि त्यांचा मुलगा पार्थ नारकर यांनी ही हाणामारी केली. या प्रकरणी आरोपी बाप लेकावर नालासोपारा इथल्या तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.