किशोर बेलसरे, प्रतिनिधी
Nashik Hit and Run Case : दारु पिऊन भरधाव वेगानं वाहन चालवण्याच्या घटना राज्यात वारंवार घडत आहेत. पुण्यात पोर्शे कारनं अल्पवयीन मुलानं दोन जणांना उडवलं होतं. या दुर्घटनेत मध्य प्रदेशातील दोन आयटी इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. तर रविवारी मुंबईत BMW कारनं वरळीमध्ये दोन जणांना उडवलं. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. पुणे आणि मुंबईपाठोपाठ आता नाशिकमध्येही याच प्रकारची घटना घडली.
नाशिकमध्ये पाच वर्षाच्या चिमुरडीला सिटी लिंकच्या बसनं चिडल्याची घटना घडली. ही मुलगी आजोबांसोबत शाळेतून घरी येत होती. त्यावेळी बसनं तिला उडवलं. नाशिकरोड भागातील सिटीलिंक बस डेपोच्या परिसरातच हा प्रकार घडला. हा प्रकार घडल्यानंतर बस ड्रायव्हर घटनास्थळावरुन फरार झाला होता.
BMW Hit and Run : एका दिवसात 40 कॉल, गर्लफ्रेंड सांगणार मिहीरचं सर्व सत्य
नाशिक पोलिसांनी काही तासांमध्येच त्याला अटक केली आहे. या आरोपी ड्रायव्हरची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये त्यानं मद्यप्राशन केल्याचं उघड झालंय. या आरोपीला नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
सानू सागर गवई असं या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चिमुरडीचं नाव आहे. पाच वर्षांची सानू पहिलीमध्ये शिकत होती. आजोबांसोबत घरी परतत असताना सिटी लिंकच्या बसनं तिला धडक दिली. आरोपी ड्रायव्हरनं मद्य प्राशन केलं होतं, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता. वैद्यकीय तपासणीमध्ये तो आरोप खरा ठरला आहे.