Navi Mumbai Bribe Case: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्र (नैना) अंतर्गत भूखंड मोजणीच्या शासकीय कामासाठी तब्बल ६ लाख रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील नीमतारदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या प्रकरणात उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासही ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई घटकाकडून ही यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली.
सुरुवातीला २ लाख, नंतर ६ लाखांची मागणी...
समोर आलेल्या माहितीनुसार, कामोठे येथील २७ वर्षीय युवक हा एका विकासकाकडे कार्यरत असून, विकासकांनी खरेदी केलेल्या टीपीएस-१ मधील भूखंड क्रमांक २७ याची मोजणी करून त्याबाबतचे अधिकृत पत्र मिळवण्यासाठी त्याच्याकडे अधिकारपत्र देण्यात आले होते. त्या अनुषंगाने तक्रारदाराने उपअधीक्षक भूमी अभिलेख (नैना) कार्यालयात अर्ज केला होता.
दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी भूखंडाची मोजणी झाल्यानंतर त्याबाबतचे पत्र देण्यासाठी नीमतारदार कलीमउद्दीन रियाजुद्दीन शेख याने तक्रारदाराशी संपर्क साधला आणि उपअधीक्षक दिलीप तुळशीराम बागुले यांची भेट घडवून दिली. त्या भेटीत उपअधीक्षक बागुले यांनी सुरुवातीला २ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकाराबाबत कंटाळून तक्रारदाराने १५ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली.
Latur News: पती करत होता दुसऱ्या महिलेसोबत चॅट, पत्नीने घातला आत्महत्येचा घाट, पुढे जे घडलं ते...
तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईत दोन्ही लोकसेवकांनी मिळून ९ लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. चर्चेनंतर ही रक्कम ६ लाख रुपयांवर तडजोडीत निश्चित करण्यात आली. दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये कारवाई केली. तक्रारदाराकडून ६ लाख रुपये स्वीकारताना नीमतारदार कलीमउद्दीन शेख यास रंगेहात पकडण्यात आले. त्याच वेळी उपअधीक्षक दिलीप बागुले यांनाही ताब्यात घेण्यात आले.
बेलापूर रेल्वे स्टेशन पार्किंगमध्ये सापळा
कारवाईदरम्यान दोन्ही आरोपींची अंगझडती घेण्यात आली आरोपी बागुले यांच्याकडे ₹750 रोख, आरोपी शेख यांच्याकडे ₹20,050 रोख, तसेच सेलेरियो कारची चावी आढळून आली. दोघांचेही मोबाईल फोन तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत.आरोपी दिलीप बागुले (बदलापूर) व कलीमउद्दीन शेख (कामोठे) यांच्या राहत्या घरांची झडती घेण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व १२ नुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नक्की वाचा - Latur News: पैशाची हाव, हत्येचा बनाव! एक चुक नडली अन् भयंकर षडयंत्राचा पर्दाफाश
ही सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे करत आहेत. या कारवाईमुळे नैना प्रकल्पाशी संबंधित शासकीय कामांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून, महसूल विभागातील गैरप्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world