राहुल कांबळे
आरोग्य व्यवसायात उज्वल करिअर घडवण्याचे आमिष दाखवून उलवेतील एका व्यक्तीकडून तब्बल 14.76 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आणि त्यांच्या पतीविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघाताच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली मुखर्जी असं त्या सेलिब्रेटी न्यूट्रिशनिस्टचं नाव आहे. फसवणुकीची ही योजना 'फ्रँचायझी मॉडेल'च्या नावाखाली करण्यात आली असून, ती एक ठरवून केलेली फसवणूक असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस आता आरोपींच्या कंपनीच्या इतर व्यवहारांचीही चौकशी करत आहेत. त्यांनी अशा प्रकारे इतर गुंतवणूकदारांनाही गंडवले आहे का त्याचा तपास करत आहेत.
में.अंजली मुखर्जी टोटल हेअल्थ प्राव्हेट लि. फ्रँचायझी देतो म्हणत लाखों रुपये उकळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2023 ते जुलै 2025 या कालावधीत, आरोपी दांपत्याने त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांच्या हेल्थ आणि वेलनेस कंपनीची फ्रँचायझी देण्याचे आमिष त्यांना दाखवले होते. "तुमचं स्वतःचं वेलनेस सेंटर सुरू होईल, त्यातून सातत्यपूर्ण उत्पन्न मिळेल," असा विश्वास निर्माण करण्यात आला. त्याल तक्रारदार भूलला. पण त्याची त्यात फसवणूक झाली.
आरोपींच्या प्रसिद्धीमुळे आणि सामाजिक प्रतिष्ठेमुळे प्रभावित होऊन तक्रारदाराने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर त्याने 14 लाख 76 हजार 994 इतकी रक्कम त्यांच्या कंपनीच्या खात्यात ट्रान्सफर केली. मात्र, पैसे घेतल्यानंतर ना फ्रँचायझी सुरू झाली ना कोणतेही अधिकृत करारनामे झाले. त्यांच्या वारंवार पाठपुराव्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, उलट वेळकाढूपणा आणि टाळाटाळ करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकारामुळे फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. नवी मुंबई पोलिसांनी सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आणि त्यांच्या पतीविरुद्ध फसवणूक (BNS अंतर्गत) आणि विश्वासघाताच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. आर्थिक गुन्ह्यांमध्ये अशाप्रकारची फसवणूक ही आता नित्याची बाब ठरत असून नागरिकांनी कोणतीही मोठी गुंतवणूक करताना अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.