प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी
Nagpur News : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट-यूजी २०२६' पेपरफुटी' घोटाळ्यात आता नागपूर कनेक्शन समोर आले आहे. या रॅकेटचा नांदेड पॅटर्न तपासताना सीबीआयच्या 'रडार'वर आता नागपूर येथील आलोक नावाचा संशयित मास्टरमाईंड आला आहे. या आलोकनेच किमान एक हजार विद्यार्थ्यांना नीटचा पेपर विकल्याचा दाट संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला आहे, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी NDTV मराठीला दिली आहे. आलोकने देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जवळपास १ हजार विद्यार्थ्यांपर्यंत थेट किंवा दलालांमार्फत पेपर पोहोचवल्याचा संशय आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी आलोकने अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना पुण्यात बोलावून घेतलं होतं.
मुलीसाठी तब्बल ५ लाख रुपयांना नीटचा पेपर
सीबीआयच्या मुंबईतील महानिरीक्षक हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सीबीआयचे तपासप्रमुख विनोद चौधरी यांनी नुकताच नांदेडमध्ये छापा टाकला होता. नीट पेपरफुटी प्रकरणात नांदेडमधील हॉटेल व्यावसायिक कदम परिवाराची चौकशी केली असता आलोकचे नाव समोर आले.
नांदेडच्या विद्युतनगरमधील अश्विनी कदम नावाच्या महिलेने आपल्या मुलीसाठी तब्बल ५ लाख रुपयांना नीटचा पेपर खरेदी केला होता. यासाठी २५ हजार रुपये ऑनलाईन टोकन मनी म्हणून दिले गेले. त्यानंतर आलोकने या मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना १५ दिवस पुण्यात एका ठिकाणी थांबवून ठेवलं आणि तिथेच तिला प्रत्यक्ष पेपर दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे.