Noida Engineer Death Case: ग्रेटर नोएडाच्या एका निर्माणाधीन मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून इंजिनिअर युवराज मेहता याला आपला जीव गमवावा लागला. ही घटना केवळ एक अपघात नसून प्रशासकीय बेजबाबदारपणाचा कळस असल्याचा आरोप होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, युवराज सुमारे दोन तास मदतीसाठी टाहो फोडत होता, त्याने आपल्या वडिलांना फोन करून वाचवण्याची विनंती केली होती, पण डोळ्यांदेखत एका बापाने त्यांचा तरुण मुलगा गमावला. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा असा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत आहे.
नेमकं काय झालं?
दिल्ली NCR मध्ये सध्या दाट धुक्याचे साम्राज्य आहे. 16 जानेवारीच्या रात्री युवराज मेहता गुरुग्रामहून ग्रेटर नोएडा येथील आपल्या घरी परतत होता. रात्री 12 च्या सुमारास दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही आणि त्याची कार अनियंत्रित होऊन रस्ता कडेची भिंत तोडून एका मॉलच्या बेसमेंटमध्ये कोसळली. या बेसमेंटमध्ये पावसाचे आणि सांडपाणी मोठ्या प्रमाणात साचलेले होते, ज्यामुळे कार पूर्णपणे पाण्यात बुडाली.
वडिलांशी फोनवर शेवटचे बोलणे
कार पाण्यात पडल्यानंतर युवराजने प्रसंगावधान राखून आपल्या वडिलांना फोन केला. पापा मी नाल्यात पडलो आहे, मला वाचवा, अशी आर्त हाक त्याने मारली. त्याचे वडील राजकुमार मेहता यांनी तातडीने कॅब पकडली आणि मुलाच्या शोधासाठी धाव घेतली.
युवराज कारच्या टपवर चढून मोबाईलच्या टॉर्चने सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होता. तो मदतीसाठी ओरडत होता, पण 40 मिनिटांनी जेव्हा त्याचे वडील तिथे पोहोचले, तेव्हा त्यांनाही असहाय्यपणे आपल्या मुलाला मृत्यूच्या दारात पाहण्याशिवाय काहीच पर्याय उरला नाही.
( नक्की वाचा : हातामध्ये सिगारेट, 120 पेक्षा जास्त स्पीडनं कार, 4 मित्राचा मृत्यू, पाहा 70 सेकंदांचा भयंकर VIDEO )
रेस्क्यू टीमच्या क्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह
या घटनेत रेस्क्यू टीमच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक रहिवाशांच्या मते, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले खरे, पण त्यांच्याकडे योग्य साधनसामग्री नव्हती.
एका डिलिव्हरी बॉयने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून युवराजला शोधण्याचा प्रयत्न केला, पण यंत्रणेकडे साधी बोट किंवा प्रशिक्षित जवान नव्हते. रात्री 2.30 च्या सुमारास युवराजच्या मोबाईलची रोशनी बंद झाली आणि एका बापाने त्यांचा मुलगा कायमचा गमावला.
( नक्की वाचा : Pune News: खंबाटकी घाटाची झंझटच संपली, 45 मिनिटांचा प्रवास आता फक्त 7 मिनिटांत ! वाचा सर्व माहिती )
प्रशासनाचे सोयीस्कर डोळेझाक
स्थानिक नागरिकांनी या धोकादायक जागेबद्दल अनेकदा नोएडा प्राधिकरणाकडे तक्रारी केल्या होत्या. तिथे रिफ्लेक्टर किंवा बॅरिकेड्स लावण्याची मागणी केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. युवराजच्या मृत्यूनंतर आता प्रशासनाला जाग आली असून त्यांनी तिथे तातडीने बॅरिकेड्स लावले आहेत.
या प्रकरणाची दखल घेत नोएडा प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लोकेश एम. यांनी एका कनिष्ठ अभियंत्याला (JE) सेवेतून बडतर्फ केले आहे, तर वरिष्ठ व्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
2 बिल्डर्सवर गुन्हे दाखल
नॉलेज पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज टाटा यूरेका पार्क सोसायटीत राहत होता आणि एका प्रसिद्ध कंपनीत कामाला होता. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा अपघात झाला असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. युवराजच्या निधनानंतर सोसायटीच्या रहिवाशांनी मेणबत्ती मोर्चा काढून न्यायाची मागणी केली आहे.