भाऊबीजेच्या दिवशी हृदय पिळवटून टाकणारा प्रकार समोर आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथील विंचू दंश झालेल्या 26 वर्षीय विवाहितेचा भाऊबीजेच्या दिवशीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंजिरी वैभव फेपडे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. तिच्या मृत्यूमुळे मानसकोंड गावावर शोककळा पसरली आहे. तिला दीड वर्षाची मुलगी आहे.
विंचू दंश झाल्यानंतर मंजिरीला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिला अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला. डॉक्टरानी तिला कोल्हापूर येथे हलवण्यास सांगितलं. कोल्हापूर येथे उपचारासाठी नेतानाच तिचा मृत्यू झाला. तिच्या या मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. मंजिरी हिचे मानसकोंड येथेच माहेर आणि सासर आहे. तिला दीड वर्षाची मुलगी असल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
3 नोव्हेंबर रोजी देशभरात भाऊबीजेचा (Bhai Dooj) सण उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी बहीण ही भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मात्र याच दिवशी वरोरा तालुक्यातील एका बहिणीला भावाची सोबत गमवावी लागली आहे. हा भाऊ भाऊबीजेसाठी बहिणीकडे जात असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला. वरोरा तालुक्यातील पोंभुर्णा तालुक्यात ही घटना घडली. भाऊबीजेच्या दिवशीच भावाच्या प्रेमाला बहीण पोरकी झाली.
नक्की वाचा - पतीच्या मृत्यूनंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी पत्नीकडून साफ करुन घेतला बेड; मध्य प्रदेशातील संतापजनक प्रकार
भाऊबीजेसाठी बहिणीकडे जाणाऱ्या भावाचा मृत्यू
भाऊबीजेसाठी जात असलेल्या भावाचा पोंभुर्णा तालुक्यात अपघात झाला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. भाऊबीजेच्या दिवशीच भावाच्या प्रेमाला बहीण पोरकी झाली. या अपघातात अक्षय निलकंठ वाढई (25) नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तो वरोरा तालुक्यातील डोंगरगाव येथून चेक आष्टा गावाकडे येत होता. मिळालेल्या माहितीनुसार, पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील अक्षय निलकंठ वाढई हा वरोरा तालुक्यातील डोंगरगाव येथे खाजगी कंपनीत काम करत होता. भाऊबीजेसाठी अक्षय दुचाकीने चेक आष्टा गावाच्या दिशेने निघाला होता. डोंगर हळदी गावानजीक असलेल्या वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.