अमजद खान, प्रतिनिधी
बजाज फायनान्स या नामांकित कंपनीच्या नावाने नागरीकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. लोनचे आमिष दाखवून फसवणूक करीत होते. या गुन्ह्यातील म्होरक्या समीर राणे याच्या शोधात मानपाडा पोलिस आहेत. धक्कादायक म्हणजे बंगालचा फोन नंबर आणि बँक अकाऊंट नंबर वापरून ही फसवणूक केली जात होती. मात्र, कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरातून हा गोरखधंदा सुरु होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
डोंबिवली पूर्वेतील आजदे गावात राहणाऱ्या किरण कोळे यांनी काही दिवसांपूर्वी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. आपली ऑनलाईन फसवणूक केल्याची तक्रार कोळे यांनी केली होती. किरण यांना पैशांची गरज होती. त्यांना एका दिवशी त्यांच्या मोबाईलवर फोन आला. फोनवरुन बोलणाऱ्या व्यक्तीने आम्ही बजाज फायनान्स कंपनीतून फोन केल्याचा दावा केला. तुम्हाला लोन पाहिजे असेल तर सांगा. लोनसाठी लागणारे विविध प्रकारचे चार्जेस असल्याचे सांगून त्यांच्याकडून त्यांनी एक लाख रुपये उकळले.
किरण यांच्या लक्षात आले की, त्यांना लोन दिले गेले नाही. केवळ पैशाची मागणी केली जात आहे. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्यावेळी पोलीस तपासामध्ये किरण यांना ज्या नंबरहून फोन आला तो बंगालमधील अकाऊंटचा आहे. तर, अबंरनाथ आणि मलंग रोडवरील एटीएममधून पैसे काढण्यात आले आहेत, असं लक्षात आलं.
( नक्की वाचा : मालेगाव बँक फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढली, ATS करणार प्रकरणाचा तपास )
पोलिसांनी संबंधीत बँकेकडून सीसीटीव्ही फूटेज मागवून घेतले. सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये पोलिसांना पैसे काढणारे दोन व्यक्ती दिसून आले. या दोन्ही व्यक्तींनी एटीएममधून पैसे काढले होते. त्यापैकी एक व्यक्ती हा कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात राहतो. पोलिसांनी या व्यक्तीच्या दुचाकीचा नंबरही शोधून काढला. त्याचा माग काढत पोलिस चक्कीनाका येथे पाेहचले. संबंधित व्यक्ती दुचाकी घेऊन चक्कीनाका येथे आला. मात्र त्वरीत दुसऱ्या ठिकाणाकरीता दुचाकी घेऊन निघाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता हा व्यक्ती दुचाकीवरुन पलावा येथे पोहचला. त्याठिकाणी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
अमोल राऊत असे त्याचे नाव होते. त्यानंतर अमोलने दिलेल्या माहितीवरुन टिना चव्हाण नावाच्या महिलेस ही मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अमोल फक्त आपला अकाऊंट नंबर समीर राणे आणि टिना चव्हाण यांना वापरण्यासाठी दिला होता. ज्या लोकांची फसवणूक केली जात होती. त्यांच्याकडून येणाऱ्या एकूण रक्कमपैकी 30 टक्के रक्कम अमोल घेत होता. उर्वरीत 70 टक्के रक्कम समीर घेत होता.
अमोल, टिना आणि समीर हे तिघांपैकी समीर आणि टिना हे अनेक वर्षापासून बँकेचे काम पाहत आहेत. त्यांना लोन कसे दिले जाते याची माहिती असल्याने त्यांनी त्याचा फायदा घेत लोकांची फसवणूक करीत होते. अंबरनाथमध्येही या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. यांनी आत्तापर्यंत अनेक लोकांची अशा प्रकारे फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे, पोलिस समीरच्या शोधात आहेत.