पालघर जिल्ह्यातील अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. अनेकदा अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागतो तर अनेकदा जीवही गमवावा लागत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे.
नक्की वाचा - करार संपला म्हणून घर सोडण्यास सांगितलं; भाडेकरुचा घर मालकिणीच्या बहिणीवर हल्ला
वाडा ग्रामीण रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या एका महिलेची वैद्यकीय समस्यांमुळे आणि पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच 108 ॲम्बुलन्समध्ये प्रसुती झाली आहे. कल्याणी भोये (24) या गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला प्रसूतीसाठी वाडा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रसूतीसाठी अडचणी येत असल्याचे कारण देत तिला ठाणे येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर 108 ॲम्बुलन्समधून ठाण्याला जात असताना वाटेतच तिची प्रसूती झाली.
नक्की वाचा - माणुसकीचा मृत्यू; अर्ध शरीर गाडीखाली, महिलेच्या मृतदेहाला ओरबाडत राहिला, संतापजनक Video
विशेष म्हणजे भिवंडी वाडा या अतिशय खराब रस्त्यामुळे महिलेची प्रवासादरम्यान आदळ-आपट झाल्याने प्रसूती झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर दुसरीकडे पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे पालघर जिल्ह्यातील रुग्णांना ठाणे, मुंबई, नाशिक किंवा सेल्वासा येथे उपचारासाठी न्यावं लागतं. मात्र वेळेत उपचार न मिळाल्याने तसेच खराब रस्त्यामुळे अनेक रुग्णांना वाटेतच जीव गमवावा लागतो. काही दिवसांपूर्वीच डहाणू तालुक्यातील गरोदर महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे सिल्वासा येथे नेत असताना रस्त्यातच महिला आणि बाळाचा मृत्यू झाला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world