संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात सुरू असलेला काळाबाजार NDTV मराठीने उघड केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील आणखी एका मंदिरातील धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंढरपुरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी 11 हजार रुपये मोजल्याचा प्रकार समोर आला आहे. विठ्ठल मंदिरामध्ये झटपट दर्शन करून देतो असं सांगत या भाविकाकडून तब्बल 11 हजार रुपये उकळण्यात आले. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणात 11 हजार रुपये घेतलेल्या चिंतामणी उत्पाद या व्यक्तीवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. चिंतामणी उत्पाद हा येथे एजंट म्हणून काम करीत असल्याचं सांगितलं जात आहे. शनिवारी सुट्टी असल्याने पंढरपुरात भाविकांची मोठी रांग होती. यावेळी तब्बल सहा ते सात तास दर्शनासाठी लागत होते. त्यामुळे उत्पाद नावाच्या एजंटने मुंबईतून आलेल्या सात तरुणांना 20 मिनिटात दर्शन घेऊन देण्यासाठी 11 हजार रुपये मागितले. उत्पात याने भाविकांकडून 11000 रुपये घेतले, यामध्ये देवस्थान समितीची पाच हजार रुपयांची देणगी पावती केली. उर्वरित सहा हजार रुपये स्वतःकडे ठेवून घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर उत्पात याच्यावर भाविकांची फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नक्की वाचा - Trimbakeshwar : VIP दर्शन बंद तरी हजारोंची मागणी, त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनाचा काळाबाजार NDTV मराठीने केला उघड
पंढरपुरातही काळाबाजार..
नाताळमधील सुट्ट्यांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी असल्याने दर्शनाच्या रांगेत 8 तास लागत होते. यावेळी अशा खासगी एजंटकडून एक व्यक्तीच्या दर्शनासाठी तब्बल तीन ते चार हजार रुपये आकारले जात असल्याचंही सांगितलं जात आहे. राज्यभरातील अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये दर्शनासाठी भाविकांकडून हजारो रुपये उकळले जात असल्याचं दिसून येत आहे.