बिहारची राजधानी पटनामध्ये कायदा आणि सूव्यवस्था आहे का? पोलिसांचा धाक आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पटनाच्या जानीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भयंकर घटना घडली आहे. गुन्हेगारांनी घरात घुसून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) पटना येथील एका नर्सच्या दोन लहान मुलांना जिवंत जाळले.
मृत मुलांची ओळख अंजली आणि अंश अशी झाली आहे. ही दोन्ही मुले जानीपूर येथील शोभा देवी आणि ललन कुमार गुप्ता यांची होती. मुले शाळेतून घरी परतली असतानाच हा जघन्य प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुले शाळेतून परतल्यानंतर लगेचच या भयानक घटनेला बळी पडली. तथापि, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही आग अपघाताने लागली की कोणत्यातरी गुन्हेगारी कृत्याचा परिणाम होती, हे स्पष्ट करण्यासाठी पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
या प्रकरणातील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका लहान मुलाचा भाजलेला मृतदेह पलंगावर पडलेला दिसत आहे, त्याच्या चेहऱ्यावर कापड बांधलेले आहे. एम्स पटना येथे नर्स असलेल्या त्याची आई, घराच्या दाराजवळ आपल्या मुलाच्या मृतदेहाशेजारी बसून रडत होती, तर शेजारी तिला सांत्वन देत होते.