Akola News: सासरचे लोक म्हणाले “तुला विकत आणलं..”, विवाहितेचा जीव गेला, अकोल्यात ठिय्या आंदोलन

अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत 24 वर्षीय विवाहित महिलेच्या मृत्यूच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola Married Woman Death News

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Married Woman Death News : अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत 24 वर्षीय विवाहित महिलेच्या मृत्यूच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. निशा विशाल घाटोळे असं मृत महिलेचं नाव आहे. निशाने आत्महत्या केली की तिची हत्या झाली,याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.9 एप्रिल रोजी दुपारी निशाने गळफास घेतल्याची माहिती तिच्या सासरच्या लोकांकडून देण्यात आली.मात्र,नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना घरात प्रवेश नाकारण्यात आला आणि मृतदेह पाहू दिला नाही,असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असून अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महिलेच्या मृत्यूबाबत नातेवाईकांचे गंभीर आरोप

मृतक निशाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार,निशाचं लग्न तीन वर्षांपूर्वी विशाल सुनिल घाटोळे नावाच्या तरुणासोबत झाला होता. लग्नाच्या वेळी सासरच्या मागणीनुसार भेटवस्तू व रोख रक्कम देण्यात आली होती.तरीही पती,सासू,सासरे,दीर-वहिनी आणि आजी-सासू यांच्याकडून निशाला सातत्याने शारीरिक,मानसिक व आर्थिक छळ सहन करावा लागत होता.

Advertisement

नक्की वाचा >> BMC मध्ये चोरी! शिवसेना नगरसेविका लक्ष्मी भाटियांच्या पर्समधून 'लक्ष्मी' चोरली, सभागृहात किती रुपये लांबवले?

दोन लाख रुपयांची मागणी, काळ्या वर्णावरून टोमणे,“तुला विकत आणले आहे” असे अपमानास्पद वक्तव्य आणि घरातील सर्व कामे जबरदस्तीने करून घेणे,असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून ती प्रचंड तणावात होती आणि सासरचे लोक जीवाला धोका असल्याची माहिती तिने माहेरी दिल्याचेही समोर आले आहे.

आंदोलन अन् पोलिसांची कारवाई

या प्रकरणात न्याय मिळावा आणि आरोपींना तात्काळ अटक करावी,या मागणीसाठी नातेवाईकांनी डाबकी रोड पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.दरम्यान,पोलिसांनी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 498A आणि 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

नक्की वाचा >> Pune News: पुणे हादरलं! आंब्याचं आमिष दाखवून चिमुकलीला रुममध्ये बोलावलं, नंतर घडला संतापजनक प्रकार

आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले असून उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून,आता तपासातून नेमकं सत्य काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.