मनोज सातवी, वसई
विरारमध्ये पेट्रोल पंप मालकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोलपंप मालक रामचंद्र खाकराणी (वय 75) यांची हत्या झाली आहे. रविवार रात्रीपासून रामचंद्र खाकराणी बेपत्ता होते. सोमवारी त्यांचा मृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावर त्यांच्याच गाडीत आढळून आला.
विरारमधील चंदनसार येथील रॉयल पेट्रोल पंपाचे मालक रामचंद्र खाकराणी यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. खाकराणी यांचा मृतदेह आज मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्याच गाडीत आढळून आला आहे. उल्हासनगर येथे राहणारे पेट्रोल पंप मालक खाकराणी यांनी रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास मॅनेजर कडून 50 हजार रुपये घेऊन निघाले होते.
(नक्की वाचा- हुंडा, संशय... पतीच्या जाचाला कंटाळून डॉक्टर पत्नीने संपवलं जीवन; अखेरचं पत्र वाचून सर्वांनाच अश्रू अनावर)
ड्रायव्हर मुकेश खुबचंदानी ते याच्यासोबत निघाले होते. मात्र ते घरी पोहोचलेच नाही. वडील घरी पोहोचले नाहीत म्हणून त्यांच्या मुलाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र खाकराणी आणि त्यांचा ड्रायव्हर मुकेश खुबचंदानी या दोघांचे फोन बंद आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांची संपर्क करून याबाबत तक्रार दिली.
(नक्की वाचा -रत्नागिरीत नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार, संताप्त नागरिक रस्त्यावर)
दरम्यान आज दुपारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामचंद्र खाकराणी यांचा त्यांच्याच गाडीत मृतदेह आढळून आला. तर त्यांच्या ड्रायव्हर फरार असल्याचे दिसून आले. खाकराणी यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.