Dhule News धुळेकरांनो सावध व्हा! एका कुटुंबाने आंधळा विश्वास ठेऊन प्लंबरला घरचं काम दिलं, पण त्याची नियत फिरली

एका कुटुंबाने प्लंबरला विश्वासाने त्यांच्या घरातील नुतनीकरणाचे काम सोपवले होते.परंतु,प्लंबरने जे कृत्य केलं त्याने कुटुंबातील सर्वांनाच मोठा धक्का बसला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dhule Plumber Gold Robbery Case

नागिंद मोरे, प्रतिनिधी 

Dhule Crime News Today : घरात काम करणाऱ्यांवर किती आंधळा विश्वास ठेवायचा? असा प्रश्न निर्माण करणारी एक घटना धुळ्यातून समोर आली आहे.एका कुटुंबाने प्लंबरला विश्वासाने त्यांच्या घरातील नुतनीकरणाचे काम सोपवले होते.परंतु,प्लंबरने जे कृत्य केलं त्याने कुटुंबातील सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याने साथीदारांच्या मदतीने घरात लाखो रुपयांची चोरी केली,अशी माहिती तपासात उघडकीस आली आहे.धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने या गुन्ह्याची उकल करत मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत.राजेश ऊर्फ भटू धरणीधर सहाणे असं मुख्य संशयित आरोपीचं नाव आहे.

चोरट्यांनी लाखोंचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले

अरुण कुमार वैद्यनगर परिसरातील एका घरात नूतनीकरणाचे काम सुरू असताना अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत,धुळे स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला.तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे,ज्या प्लंबरने या घरात काम केले होते,त्याच्यावरच पोलिसांचा संशय बळावला.याच संशयाच्या सुईने पोलिसांना तपासाची योग्य आणि अचूक दिशा दाखवली.

Advertisement

नक्की वाचा >> 'या' तारखेपासून NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक, मेट्रो, रेल्वे, बससह इतर वाहतुकीसाठीही फायदेशीर

तीन संशयीत आरोपी फरार

स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार,पोलिसांनी शहरातील चक्करबर्डी फाट्याजवळ सापळा रचून राजेश ऊर्फ भटू धरणीधर सहाणे मुख्य संशयिताला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने या चोरीची कबुली दिली असून,या गुन्ह्यात त्याला शैलेश साळुंखे,विवेक ऊर्फ दादू भवर आणि अमोल ऊर्फ सोनू दीनबहादूर या तीन साथीदारांनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

नक्की वाचा >> Electric Car: पहिल्यांदाच हायब्रिड लूकमध्ये दिसणार सर्वांची आवडती 'ही' कार, सिंगल चार्जमध्ये करणार 400 km पार

पोलिसांनी या संशयिताकडून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 14 लाख 97 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस उर्वरित तीन फरार संशयिता आरोपी शोध घेत आहेत.