उद्या 20 मे रोजी महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. उद्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण 13 मतदारसंघांत मतदान होणार आहे. दरम्यान मतदानाच्या आदल्या दिवशी धुळ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हर हर महादेव या व्यायाम शाळेत धुळ्यातील एका अल्पवयीन मुलीचे लहान भाऊ-बहिण कुस्ती शिकण्यासाठी जात होते. येथील प्रशिक्षण म्हणून काम पाहणारे रितीक उर्फ दादू राजेंद्र राजपूत याने अल्पवयीन पीडित तरुणीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय तिला लग्न करण्याचा आग्रह केला. याशिवाय ऐकलं नाही तर तुझ्या कुटुंबाला जीवे मारेल अशी धमकी दिली होती. यामुळे 10 जानेवारी रोजी याच कारणावरुन पीडितेसह तिच्या कुटुंबाला रस्त्यात अडवलं आणि पीडितेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. घरी जात असताना भाजप धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी पोलिसात जाऊ नको असं सांगत धमकी दिली.
मात्र तरीही पीडित तरुणीची बहिण, आई आणि भावांसह चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गेले असता संबंधित पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. उलटपक्षी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी दाखल केलेली खोटी तक्रार नोंदवून घेत फिर्यादी, तिची आई व दोन्ही भावांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आले होते.
नक्की वाचा - पुतणीवर जडले प्रेम, भडकलेल्या पत्नीने शिकवला धडा; मात्र ड्रामा इथेच संपला नाही
या गुन्ह्यात फिर्यादीच्या वडिलांचं नावंही गोवण्यात आल्याचं फिर्यादीचं म्हणणे आहे. बाहेर आल्यानंतर पुन्हा चाळीसगाव रोड पोलिसांना विनंती करण्यात आली, मात्र त्यांनी नकार दिल्याने या संदर्भात न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. यावर न्यायालयाने खातर जमा करून पोक्सोसह भादंवी 354, 323, 504, 506(2), 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रात्री उशिरा भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपडकर यांच्या विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीमध्ये हर हर महादेव व्यायाम शाळेचा कुस्ती प्रशिक्षक दादू राजपूत, भाजपाचे जिल्हाप्रमुख गजेंद्र महादेव अंपळकर, माजी उपमहापौर कल्याणी सतीश अंपळकर, सुहास सतीश अंपळकर, जतिन उर्फ अजय आव्हाळे यांचा समावेश आहे. न्यायालयाकडून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. या घटनेने धुळे जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.