
Prayag Manjhi : झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात सोमवारी सकाळी सीआरपीएफचे कोबरा कमांडो-पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला. याशिवाय आणखी सात नक्षलवाद्यांनाही संपवण्यात आलं आहे. सुरक्षा दलाने घटनास्थळावरुन एक एके सीरिज रायफल, तीन इन्सास रायफल, एक सेल्फ लोडिंग रायफल, 8 बंदुका आणि एक पिस्तुल जप्त केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सीआरपीएफचे कोबरा कमांडो-पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 80 च्या दशकात नक्षलवादात पाऊल ठेवणारा प्रयाग मांझी उर्फ विवेक दा याचा खात्मा करण्यात आला आहे. प्रयाग मांझी हा धनबाद जिल्ह्यातील दलबुढा गावातील राहणारा होता. प्रयाग पारसनाथ आणि झुमरा पर्वतीय भागात सक्रिय होता. याशिवाय छत्तीसगड, बिहार आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यातही त्याचं जाळं पसरलं होतं.
भाकपा माओवादी संघटनेच्या सेंट्रल कमिटीचे सदस्य प्रयाग मांझी याला 2023 मध्ये पारसनाथ आणि झुमरा पर्वतीय भागाची जबाबदारी सोपवली होती. या गटाचे सदस्य आणि एक कोटींचं बक्षीस असलेले नक्षलवादी प्रशांत बोस याला अटक केल्यानंतर मिसिर बेसराने पारसनाथची जबाबदारी घेतली होती. यानंतर मिसिर बेसराने ही जबाबदारी विवेककडे सोपवली होती.
नक्की वाचा - Bangladesh Crime : कोण आहेत भबेश चंद्र रॉय? अपहरणानंतर नेमकं काय घडलं, हत्येचा घटनाक्रम समोर
7 महिन्यापूर्वी प्रयागच्या पत्नीचा मृत्यू...
प्रयाग मांझी याची पत्नी जया मांझी हिचा सात महिन्यापूर्वी 21 डिसेंबर 2024 साली रिम्समधील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तिला गॉल ब्लॅडर कर्करोगाची लागण झाली होती. 25 लाखांचं बक्षीस असलेल्या नक्षलवादी जया मांझीला गिरीहिड पोलिसांनी 16 जुलै 2024 रोजी धनबादमधील एका खासगी रुग्णालयातून अटक केली होती. येथे नाव बदलून ती उपचार घेत होती.
जया मांझी भाकपा माओवादी संघटना महिला विंगची प्रमुख सदस्य होती आणि या विंगचे काम पाहत होती. मात्र आजारपणामुळे ती भूमिगत झाली होती आणि लपूनछपून धनबाद रुग्णालयातून उपचार घेत होती. मात्र पोलिसांना याबद्दल टीप मिळाली आणि ज्यानंतर तिला अटक करण्यात आली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world