ससूनमधील डॉक्टरांची चौकशी समिती वादात, SIT च्या अध्यक्ष डॉ. सापळेंवर काय आहेत आरोप?

पुण्यातील अपघातानंतर आरोपीला वाचवण्यासाठी राजकीय नेते आणि पोलीस यंत्रणेनं मदत केल्याचा आरोप असतानाच आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याची बाब नुकतीच उघड झाली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
पुणे:

पुण्यातील कल्याणीनगर इथं झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर बरबटलेल्या व्यवस्थेचा नवनवा चेहरा दिवसागणिक उघड होत आहे. अपघातानंतर आरोपीला वाचवण्यासाठी राजकीय नेते आणि पोलीस यंत्रणेनं मदत केल्याचा आरोप असतानाच आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याची बाब नुकतीच उघड झाली आहे. मात्र या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी ज्या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली, त्या पथकाच्या अध्यक्षावरच यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचं आता समोर आलं आहे.

अपघातानंतर अल्पवयीन आरोपीची चाचणी करण्यात आल्यानंतर घेतलेले रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. अपघातानंतर ससून रुग्णालयात आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र डॉ. सापळे यांच्यावर यापूर्वी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. ज्या व्यक्तीवर आधीच भ्रष्ट्राचार आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत, त्यांना याचा तपास सोपवल्यानंतर विरोधी पक्षांसह अनेकांनी सवाल उपस्थित केला आहे. 

Advertisement

काय आहेत आरोप? 
डॉ. पल्लवी सापळे यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तसंक्रमण शास्त्र विभागात असताना रक्तातील प्लाझ्मा विकून शासनाच्या परवानगीशिवाय 13 लाख रुपये जमा केले. या पैशातून रुग्णवाहिका खरेदी करून ती आईने दान दिल्याचं सांगितलं, असा आरोप डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर करण्यात आला आहे. तसंच त्या वापरत असलेल्या वाहनाच्या बिलाबाबत बनवाबनवी केल्याचे आरोप आहेत. डॉ. सापळे यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना तसेच आता जेजे रुग्णालयात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी केला होता. जेजे रुग्णालयात औषध, यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर 5 ते 10 टक्के कमिशन घेतल्याशिवाय सह्या करत नाहीत, असेही त्या म्हणाल्या होत्या. 

Advertisement

डॉ. सापळे यांच्यावर केलेले आरोप 
- डॉ. सापळे भाड्याची गाडी वापरत असून त्याचे महिन्याला एक लाख रुपयांचे बिल शासनाला सादर करतात. हा खर्च 70 ते 80 लाख रुपयांवर गेला आहे. 
- मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तसंक्रमण शास्त्र विभागात असताना रक्तातील प्लाझ्मा विकून शासनाच्या परवानगीशिवाय 13 लाख रुपये जमा केले आणि त्यातून ॲम्ब्युलन्स खरेदी करून ती आईने दान दिल्याचे सांगितले. 
- ऑगस्ट 2022 मध्ये सहसंचालक पदावर पदोन्नती आणि संभाजीनगर येथे बदली झाली आहे. मात्र अजूनही त्यांच्या बदलीचे आदेश निघालेले नाहीत.

Advertisement

नक्की वाचा - महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अ‍ॅक्शन मोडवर, ससूनमधील 'त्या' दोन्ही डॉक्टरांवर कारवाई

ससून रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई 
आरोपीच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. डॉ. अजय तावरे यांनी फोन करुन रक्ताचे नमुदे बदल्याची सूचना श्रीहरी हाळनोर यांना दिली होती. त्यामुळे डॉक्टरांनी आरोपी ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठवून प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली आणि दोघांना अटक करण्यात आली.

पल्लवी सापळे यांच्यावर होणाऱ्या आरोपाबाबत त्या म्हणाल्या की, माझी नियुक्ती शासनामार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे या आरोपांवर शासनातील अधिकारी उत्तर देतील.