Pune Terror Module Busted: महाराष्ट्र एटीएसने (ATS) पुणे शहरात धडक कारवाई करत टेरर फंडिंग नेटवर्कशी संबंधित 18 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे दहशतवादी नेटवर्कमध्ये केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोकच नव्हे, तर उच्चशिक्षित व्यक्ती, आयटी अभियंते (IT Engineers), बँक कर्मचारी आणि ठेकेदार यांसारख्या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या खुलाश्यामुळे पुणे शहराच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
कोथरूडपासून बोहरा हाऊसपर्यंत नेटवर्कचा उलगडा
या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची सुरुवात 2023 मध्ये कोथरूड परिसरात घडलेल्या एका बाईक चोरीच्या घटनेतून झाली होती. त्या प्रकरणातील काही आरोपींच्या चौकशीतून हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये कार्यरत एका डॉक्टरचे नाव समोर आले. या डॉक्टरचे थेट संबंध काही दहशतवादी संघटनांशी जोडलेले असल्याचे तपासात उघड झाले. या माहितीच्या आधारावर एटीएसने कोंढवा परिसरातील नेटवर्कचा उलगडा केला, जिथून अनेक व्यक्ती या डॉक्टरच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले.
टेरर फंडिंगसाठी काम करणाऱ्या या संपूर्ण नेटवर्कवर एटीएसने तब्बल एक वर्ष गुप्तपणे नजर ठेवली होती. या काळात, तपास यंत्रणांनी निधी संकलनाचे व्यवहार, बँक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि सोशल मीडियावरील संवाद यांचा सखोल तपास केला. या तपासामुळे नेटवर्कचे राज्याबाहेरील आणि परदेशी (Foreign) घटकांशी असलेले संबंध समजण्यास महत्त्वपूर्ण मदत मिळाली.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात सर्वात मोठी दहशतवादविरोधी कारवाई; कोथरूडच्या एका साध्या चोरीने दहशतवादी जाळे कसे उघड केले? )
पुण्यातील विविध भागांत छापे
एटीएसने कारवाईदरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी छापे टाकले. यात कोंढवा, खडक, खडकी, वानवडी आणि पिंपरी-चिंचवडमधील बोहरा हाऊस यांसारख्या परिसरांचा समावेश आहे. या ठिकाणांहून संशयितांची हालचाल, बैठका आणि टेरर फंडिंगशी संबंधित आर्थिक व्यवहारांचे महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
साताऱ्यात व्यवहार
तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील एका दुकानातून लष्करी साहित्य खरेदीसाठी तब्बल 9 लाख रुपये) इतक्या रकमेचा व्यवहार करण्यात आला होता. या खरेदीचा थेट संबंध टेरर फंडिंग नेटवर्कशी असल्याचे एटीएसने प्राथमिक तपासात स्पष्ट केले आहे़
एटीएस आता या नेटवर्कचा राज्याबाहेरील आणि परदेशी घटकांशी असलेला संबंध अधिक तपासत आहे. बँक व्यवहारांचे सखोल विश्लेषण, जप्त केलेले डिजिटल पुरावे आणि विदेशी खात्यांशी असलेले संभाव्य संबंध यावर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रित आहे. आगामी काही दिवसांत या प्रकरणात अधिक अटक आणि महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे.
पुणेकरांना आवाहन
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "आपल्या परिसरात कोण राहतोय, त्यांची पार्श्वभूमी तपासणे आणि ओळखपत्र पडताळणे ही घरमालकांची जबाबदारी आहे," अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. या प्रकरणानंतर घरमालक आणि सोसायट्यांनी भाडेकरूंविषयी सतर्कता वाढवणे गरजेचे झाले असून, समाजात जागरूकता आणि सतर्क राहण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.