जाहिरात

Pune News: पुण्यात सर्वात मोठी दहशतवादविरोधी कारवाई; कोथरूडच्या एका साध्या चोरीने दहशतवादी जाळे कसे उघड केले?

Pune Terror Module Busted: एका किरकोळ दुचाकी चोरीच्या तपासाने धक्कादायक वळण घेत पुणे शहराला हादरवून सोडले आहे.

Pune News: पुण्यात सर्वात मोठी दहशतवादविरोधी कारवाई; कोथरूडच्या एका साध्या चोरीने दहशतवादी जाळे कसे उघड केले?
Pune Terror Module Busted: पुण्यात ATS आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune Terror Module Busted: एका किरकोळ दुचाकी चोरीच्या तपासाने धक्कादायक वळण घेत पुणे शहराला हादरवून सोडले आहे. या चोरीच्या तपासात महाराष्ट्र एटीएस (ATS) आणि पुणे पोलिसांना दहशतवादी संघटनांशी संबंधित एका मोठ्या नेटवर्कचा सुगावा लागला. या माहितीच्या आधारावर, गुरुवारी पहाटेपासून कोंढवा, वानवडी, खडकी आणि इतर परिसरात सर्वात मोठी छापेमारी सुरू झाली असून, शहरभर खळबळ उडाली आहे.

ATS च्या कारवाईत काय झालं?

एटीएस आणि पुणे पोलिसांच्या सुमारे 200 अधिकारी आणि 500 कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने कोंढवा आणि आसपासच्या परिसरात तब्बल 25 ठिकाणी एकाच वेळी झडती घेतली. ही कारवाई राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मोठ्या तपासाचा भाग असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

या कारवाईदरम्यान पथकाने लॅपटॉप्स, सिम कार्ड्स, मोबाईल फोन्स आणि काही संवेदनशील कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणात 18 संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. यापैकी काहींना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Pune News : बापरे! बांधकाम साहित्याच्या धोकादायक लोडिंगमुळे पुण्यात शालेय बसला भीषण अपघात )
 

चोरीतून उघड झाली ‘ISIS' मॉड्युलची साखळी


या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 2023 मध्ये कोथरूड येथे झालेल्या एका दुचाकी चोरीच्या प्रकरणातून झाली. सुरुवातीला हा एक साधा गुन्हा वाटत होता, मात्र तांत्रिक पुराव्यांवरून या चोरीत सहभागी असलेल्या काही जणांचे कट्टरपंथी संघटनांशी थेट संबंध असल्याचे उघड झाले.

या प्रकरणाच्या तपासात हडपसरमधील नोबेल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका डॉक्टरचे नाव समोर आले आहे.

 सूत्रांच्या माहितीनुसार, या डॉक्टरने "आयएसआयएस (ISIS) मॉड्युल नेटवर्क" तयार केले होते. हे नेटवर्क दहशतवादी संघटनांसाठी निधी उभारणी आणि आर्थिक व्यवहाराचे काम करत होते. 17 आरोपींपैकी काहींचा थेट दुबईशी संपर्क असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

केंद्रीय गुप्तचर यंत्रणा गेल्या 2 वर्षांपासून या नेटवर्कवर लक्ष ठेवून होत्या, ज्याची मुळे आता कोंढवा परिसरात रुजली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

( नक्की वाचा : Job Crisis: AI मुळे 44 क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात; तुमचं प्रोफेशन आहे का यादीत? OpenAI कडून धोक्याचे संकेत! )
 

कोंढवा ‘हॉट स्पॉट' रडारवर

एटीएसच्या अहवालानुसार, कोंढवा परिसर बाहेरून आलेल्या लोकांना सहजपणे भाड्याने घरे उपलब्ध होत असल्याने दहशतवादी हालचालींसाठी एक 'सेफ हाऊस' म्हणून वापरला जात आहे. पोलिसांना या भागात गेल्या काही वर्षांपासून स्लीपर सेल्स सक्रिय असण्याची शंका आहे.

2022-2023 मध्ये कोंढव्यातून दोन दहशतवादी अटक झाल्यानंतर हा परिसर गुप्तचर संस्थांच्या रडारवर आहे. त्याच परिसरातील अशोका (गुरुपुरम) सोसायटी पुन्हा एकदा तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे, जिथे यापूर्वीही संशयितांना अटक करण्यात आली होती.

पोलिसांचे आवाहन

पुणे पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक मुस्लिम समाजानेही, "कोंढवा काही बाहेरून आलेल्या लोकांमुळे बदनाम होत आहे. घर भाड्याने देताना कागदपत्रांची काटेकोर तपासणी करणे आवश्यक आहे," असे मत व्यक्त केले आहे.

कोंढवा आणि आसपासच्या भागात नाकाबंदी आणि सुरक्षा वाढवण्यात आली असून, ही मोहीम आज उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. एटीएसकडून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com