राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
राज्य सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नागपूर विभागातील धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघड झाला होता. अतिरिक्त कामासाठी मुख्य अभियंता एक टक्के रक्कम घेतात, असा खळबळजनक खुलासा एका त्रस्त कामगाराने केला होता. याचा व्हिडिओही समोर आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच पुणे जिल्हापरिषदेमध्ये लाचखोरीचं प्रकरण उघड झालंय. या प्रकरणात 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक झालीय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह तीन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले अदा करण्यासाठी लाच स्विकारताना या तिघांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
कार्यकारी अभियंता (दक्षिण विभाग) बाबुराव कृष्णा पवार (वय 57 वर्षे), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय 57 वर्षे) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे यांचा समावेश आहे.
'लाचलुचपत'च्या पुणे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Honey Trap : फेसबुकवरील मैत्रीची तार ISI पर्यंत पोहचली, पाकिस्तानला माहिती देणारा हेर अखेर सापडला! )
एका 57 वर्षीय कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती तक्रारदाराने जिल्हा परिषदेकडून निविदा प्रक्रियेतून मिळालेली विकासकामे पूर्ण केली होती. या पूर्ण केलेल्या कामांची देयके जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे प्रलंबित होती. ही रक्कम हवी असेल तर, अदा करावयाच्या एकूण रकमेच्या 2 टक्के रक्कम लाच म्हणून द्यावी लागेल, अशी मागणी या अधिकाऱ्यांनी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानुसार 1 लाख 42 हजार रुपायांची लाच स्वीकारताना या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
नागपुरात काय घडले?
राज्य सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नागपूर विभागातील अतिरिक्त कामासाठी मुख्य अभियंता एक टक्के रक्कम घेतात, असा खळबळजनक खुलासा एका त्रस्त कामगाराने केला होता. याचा व्हिडिओही समोर आला होता. 'NDTV मराठी' नं हे प्रकरण लावून धरलं होतं.
त्यानंतर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरणात कडक कारवाई होईल, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.