पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकात एका तरुणाचा कानात ईअरफोन घातल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या मोबाइलचं व्यसन अनेकार्थाने जीवघेणं ठरत आहे. एकमेकांशी बोलण्यापेक्षा लोक मोबाइलमध्ये व्यग्र असतात तर ईअरफोन घालून वारंवार गाणी किंवा रील्स पाहिली जातात. याचा फटका एका कुटुंबाला सहन करावा लागला आहे. मोबाइल आणि ईअरफोनच्या व्यसनामुळे या कुटुंबातील अवघ्या 21 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
नक्की वाचा - 'पाच मिनिटात घरी ये अन्यथा..'; पतीची सटकली, पत्नीच्या नातेवाईकांच्या जीवावर उठला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या राजधानी एक्सप्रेस गाडीखाली आल्याने या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नितेश चौरसिया (21) असं या तरुणाचं नाव असून सफाळे येथे क्रिकेटच्या मैदानात सरावासाठी येत असताना हा अपघात घडला. नितेश नेहमी प्रमाणे मुंबईहून सफाळे येथे क्रिकेटच्या सरावासाठी येत असताना रेल्वे रूळ ओलांडताना हा अपघात घडला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सफाळे स्थानकात लोकलमधून उतरुन कानात ईयरफोन टाकून तो रेल्वे रूळ ओलांडत होता. त्याच दरम्यान मुंबईकडे जाणारी राजधानी एक्सप्रेस येत असताना त्याच्या कानात ईअरफोन असल्याचे त्याला गाडीचा आवाज आला नाही. त्यावेळी आजूबाजूच्या प्रवाशांनीही आरडाओरड केली होती. मात्र ईअरफोन मुळे आवाज न आल्याने नितेशचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. याबाबत सफाळे रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.