Sadhvi Prem Baisa Death Mystery: एक प्रसिद्ध कथावाचक, लाखो अनुयायी आणि सोशल मीडियावर सक्रिय असणारी एक मोठी व्यक्तिमत्त्व. पण अचानक एका रात्री असं काही घडतं की संपूर्ण राज्य हादरून जातं. ही घटना केवळ एका मृत्यूची नाही, तर त्याभोवती असलेल्या अनेक रहस्यमयी धाग्यांची आहे. इन्स्टाग्रामवर मृत्यूच्या चार तासानंतर पडलेली एक पोस्ट, वडिलांसोबतचा तो जुना वादग्रस्त व्हिडिओ आणि एका इंजेक्शननंतर झालेला शेवट, या सगळ्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वळणही मिळालं आहे.
काय आहे प्रकरण?
राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील ही संपूर्ण घटना आहे. बोरानाडा येथील आश्रमात राहणाऱ्या साध्वी प्रेम बाईसा यांचा बुधवारी रात्री संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना ताप आल्यामुळे आश्रमातच एका कंपाऊंडरला बोलावण्यात आलं होतं.
त्या कंपाऊंडरने साध्वींना एक इंजेक्शन दिलं आणि अवघ्या 5 मिनिटांत त्या बेशुद्ध पडल्या. त्यांचे वडील वीरम नाथ आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जोधपूरमधील एका खाजगी रुग्णालयात नेलं, पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. धक्कादायक बाब म्हणजे, डॉक्टरांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता, पण वडिलांनी खासगी वाहनातून मृतदेह नेणं पसंत केलं.
( नक्की वाचा : Commando Murder: सुरक्षेचे धडे देणाऱ्या SWAT कमांडोची घरच्या युद्धात हार; एका डंबेलने उद्ध्वस्त केला संसार! )
मृत्यूच्या 4 तासानंतरची ती इन्स्टाग्राम पोस्ट
साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूने जितका धक्का बसला नाही, तितकी खळबळ त्यांनी मृत्यूनंतर पडलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने उडवून दिली आहे. त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून रात्री उशिरा एक पोस्ट शेअर करण्यात आली, ज्यामध्ये त्यांनी जगाचा निरोप घेत असल्याचं लिहिलं होतं.
या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की, मी आयुष्यभर सनातन धर्माच्या प्रचारासाठी जगले. मी अनेक संतांना पत्र लिहून अग्निपरीक्षेची मागणी केली होती, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. या पोस्टच्या शेवटी त्यांनी लिहिलं होतं की, माझ्या हयातीत नाही पण माझ्या मृत्यूनंतर मला नक्कीच न्याय मिळेल. त्यांच्या वडिलांच्या दाव्यानुसार, ही पोस्ट त्यांच्याच मोबाईलवरून एका सहकारी गुरु महाराजांनी शेअर केली होती.
जुना व्हिडिओ आणि वादाची किनार
साध्वी प्रेम बाईसा गेल्यावर्षी एका व्हिडिओमुळे प्रचंड चर्चेत आल्या होत्या. त्या व्हिडिओमध्ये त्या त्यांच्या वडिलांसोबत एका खोलीत होत्या. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, त्यावेळी साध्वींनी स्पष्ट केलं होतं की, हे बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम आहे आणि त्यांना बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने पसरवला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्यावेळी एका व्यक्तीला अटकही केली होती. आता त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा त्या जुन्या वादाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
( नक्की वाचा : 'आई-बाबा तुमची मुलगी हारली...'; मरतानाही दुधवाल्याचे पैसे चुकते करणाऱ्या माऊलीची करुण कहाणी )
या मृत्यू प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राजस्थानमधील राजकारण तापू लागलं आहे. आरएलपी नेते हनुमान बेनीवाल यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना या घटनेची दखल घेण्याचे आवाहन केलं आहे. साध्वींचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे काहीतरी मोठं षडयंत्र असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. सध्या पोलिसांनी संबंधित कंपाऊंडरला ताब्यात घेतलं असून त्याचे वैद्यकीय साहित्य जप्त केलं आहे.