शरद सातपुते, सांगली:
Satara Crime: गेल्या काही दिवसांपासून राज्यात खून, मारामाऱ्यांच्या घटनांचे सत्र सुरु आहे. क्षुल्लक कारणांवरुन जीव घेतल्याच्या धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. अशीच भयंकर घटना सांगलीमधून समोर आली आहे. फक्त मावा मागितल्याच्या रागातून एका तरुणाला चाकूने भोसकल्याची घटना घडली आहे. या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
मावा मागितल्याच्या वादातून हत्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मावा मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादावादीतून सांगलीच्या वडर गल्लीमध्ये नारायण सुरेश पवार या 28 वर्षीय तरुणाला चाकूने भोसकले होते. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नारायण पवार याच्या खून प्रकरणी सुरज उर्फ बिल्ला रामा पवार, कुणाल तातोबा जाधव आणि चंदू नाईक या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाला अटक
नारायण पवार याने तिघा संशयितांकडे मावा मागितला होता. यावेळी तिघांनी "आम्ही मावा कोणाला देत नाही आणि कोणाकडून घेत नाही" असे म्हटल्याने त्यांच्यामध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला. वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले होते. यानंतर संतापलेल्या तिघांनी नारायण पवार या तरुणाला चाकूने भोसकले होते.
त्याला तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघा संशयीतापैकी एकाला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अन्य दोघांच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखा आणि विश्रामबाग पोलिसांची पथके रवाना करण्यात आलेत.