शरद सातपुते, प्रतिनिधी
Sangli Crime News : चहा विक्रीच्या नावाखाली बनावट नोटा छापण्याचा मोठा उद्योग सांगली पोलिसांनी उघडकीस आणला आहे. कोल्हापूर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी तब्बल 99 लाख 23 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण 1 कोटी 11 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, टोळीचा सूत्रधार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासह एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
बनावट नोटांचा छपाई कारखाना उद्ध्वस्त
सांगलीतील महात्मा गांधी चौकी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (L.C.B.) संयुक्त कारवाई करत बनावट नोटांची छपाई आणि तस्करी करणाऱ्या या टोळीला गजाआड केले. मिरज शहरातल्या कोल्हापूर रोडवरील निलजी-बामणी पुलाजवळ बनावट नोटा विक्री करताना एका आरोपीला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून 42 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यातील उच्चशिक्षित IT इंजिनियर, बँक कर्मचारी दहशतवादी गटात सहभागी! ATS नं उधळला मोठा कट )
या आरोपीच्या चौकशीतून, बनावट नोटा कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीमध्ये एका चहाच्या दुकानामध्ये छापण्यात येत असल्याची माहिती समोर आली. या माहितीनुसार सांगली पोलीस आणि L.C.B. च्या पथकाने कोल्हापूरमध्ये छापा टाकत बनावट नोटांचा छपाई कारखाना उद्ध्वस्त केला. या ठिकाणी 'सिद्धकला चहा' नावाचे दुकान होते, जे पोलीस हवालदार इब्रार इनामदार याचे होते. छाप्यात कलर झेरॉक्स मशीनसह बनावट नोटा छापण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जप्त करण्यात आले.
कोल्हापूरमधून छापलेल्या या बनावट नोटा मुंबईकडे विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सांगली-पुणे-बंगळूर महामार्गावरील कासेगाव येथे सापळा रचला. एका इनोव्हा गाडीतून तस्करी होत असलेल्या 99 लाख 23 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या जप्त नोटांमध्ये 500 रुपये आणि 200 रुपये मूल्याच्या बनावट नोटांचा समावेश आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुण्यात सर्वात मोठी दहशतवादविरोधी कारवाई; कोथरूडच्या एका साध्या चोरीने दहशतवादी जाळे कसे उघड केले? )
पोलिसच निघाला 'मास्टरमाईंड'
या बनावट नोटांच्या गोरख धंद्याचा सूत्रधार कोल्हापूर पोलीस दलातील मोटर परिवहन विभागात कार्यरत असलेला पोलीस हवालदार इब्रार इनामदार असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे (सांगली) यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
इब्रार इनामदार (पोलीस हवालदार, मूळ कोल्हापूर) - मुख्य सूत्रधार
सुप्रित देसाई (कोल्हापूर)
राहुल जाधव (कोल्हापूर)
नरेंद्र शिंदे (कोल्हापूर)
सिद्धेश म्हात्रे (मुंबई)
मोठ्या रॅकेटचा संशय
प्राथमिक तपासानुसार, कोल्हापूर येथून महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी या बनावट नोटांची विक्री केली जात होती. हे आरोपी खऱ्या 500 रुपये मूल्याच्या एका नोटेच्या बदल्यात बनावट 500 रुपये मूल्याच्या तीन नोटा देत होते.
या टोळीने यापूर्वी किती बनावट नोटांची विक्री केली आणि हे जाळे कोठे कोठे पसरले आहे, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोल्हापूरच्या पोलीस कर्मचाऱ्यानेच चहा विक्रीच्या नावाखाली सुरू केलेला हा बनावट नोटांचा गोरख धंदा आणि त्याचे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले जाळे उघडकीस आल्याने, सांगली पोलिसांसह महाराष्ट्र पोलिसांसमोर या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.