मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराड आणि गँगचे पाय आणखी खोलात गेले आहेत. त्यांच्या विरोधात आरोपपत्रामध्ये आणखी एक ठोस पुरावा जोडला गेला आहे. या पुराव्याची प्रत NDTV मराठीच्या हाती लागली आहे. तो पुरावा म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरचा वैद्यकीय अहवाल आहे. या अहवालात संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कशा मुळे झाली आहे, याचा उल्लेख आहे. हा अहवाल ती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. हाच अहवाल आरोपपत्रात जोडण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली. त्यासाठी वाल्मीक कराड आणि त्याच्या गँगने काही हत्यारांचा वापर केला होता. त्यात गॅस पाईप, गाडीच्या क्लच वायरचा धातूचा चाबूक, लाकडी बांबूची काठी, लोखंडी पाईप यांचा समावेश होता. याच हत्यारांच्या सहाय्याने देशमुख यांना अमानूष मारहाण करण्यात आली होती. या हत्यारांनी एखाद्याचा मृत्यू होवू शकतो का? याचा अहवाल डॉक्टरांच्या पथकाकडून मागवण्यात आला होता. हा अहवाल तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सादर केला आहे.
या अहवालात त्यांनी गॅस पाईप, गाडीच्या क्लच वायरचा धातूचा चाबूक, लाकडी बांबूची काठी, लोखंडी पाईप या वस्तूंनी मारहाण केल्यास मृत्यू होवू शकतो असं म्हटलं आहे. त्यामुळे हा एक ठोस पुरावा पोलीसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे वाल्मीक आणि त्याच्या गँगचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. काही दिवसापूर्वी संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर सर्वच स्तरावर आरोपीं विरोधात संताप व्यक्त केला जात होता.
त्या आधी संतोष देशमुखे यांचा शवविच्छेदन अहवाल ही समोर आला होता. त्यात संतोष देशमुख यांच्या हनुवटीवर जखमांच्या खुणा होत्या. कपाळ आणि दोन्ही गालावर जखमा होत्या. पोटावर मारहाण झाल्याने जखमा झाल्या होत्या. नाकातून रक्त बाहेर येऊन सुकले होते. छाती, गळ्यावरील समोरील उजव्या बाजूला जखमा होत्या. छातीवर उजव्या व डाव्या बाजूला तसेच बरगडीवर मारहाणीमुळे जखमा झाल्या होत्या. डाव्या खांद्यावर, दंडावर, कोपऱ्यावर, मनगटावर, हाताच्या मुठीवर तसेच मधल्या बोटाला दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. पोटरीवर, मांडीवर, गुडघ्यावर तसेच नरगडीवर मारहाणीच्या जखमा होत्या. तर मारहाणीमुळे संपूर्ण पाठीसह अंग काळे-निळे पडले होते.
या हत्येच्या कटामध्ये आरोपी क्रमांक एक वाल्मीक कराड, आरोपी दोन विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, आठव्या क्रमाकांवर फरार कृष्णा आंधळेचा समावेश करण्यात आला आहे. नववा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याचे नाव वगळण्यात आले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्धचे सबळ पुरावे सापडल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. आता या हत्येचे फोटो समोर आले आहे. त्यानंतर हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्याराने एखाद्याचा मृत्यू होवू शकतो याचाही अहवाल समोर आला आहे.