स्वानंद पाटील, प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून मारहाणीच्या घटनेमुळे राज्यात चर्चेत असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याला मोठा धक्का बसला आहे. सतीशला आज (बुधवार, 12 मार्च) प्रयागराजमधून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याला आता एक वर्षांसाठी बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्या हद्दपारीसाठी महसूल विभागाला दिलेल्या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे मान्यता दिली आहे. त्यामुळे सतीश भोसलेची बीडमधून हद्दपारी निश्चित झालीय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहे सतीश भोसले?
काही दिवसांपूर्वी बीडच्या शिरुरमध्ये एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचप्रकरणी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि भाजप पदाधिकारी सतीश भोसले उर्फ खोक्या हा पोलिसांच्या रडारवर आला होता. या मारहाण प्रकरणानंतर सतीश भोसलेचे अनेक कारनामे समोर आले होते. त्यानंतर त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याचबरोबर त्याच्यावर शिरूर, चकलांबा पोलीस ठाण्यासह तिसरा गुन्हा वनविभागाने दाखल केलेला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून सतीश भोसले हा फरार झाला होता. बीड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. अखेर आता सतीश भोसलेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
( नक्की वाचा : Jayant Patil : ' आमचा दारुण पराभव झालाय... माझं काही खरं नाही', जयंत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ )
सतीश भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील रहिवासी आहे. मागील पाच वर्षांपासून तो राजकारात सक्रिय असून भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा आमदार सुरेश धस यांच्याशी त्याची जवळीक वाढली होती.