Dombivli : आमच्या सुरक्षिततेचे काय? डोंबिवलीत नमाजवरून झालेल्या मारहाणीनंतर मुस्लीम समाजाचा प्रशासनाला प्रश्न

Dombivli Namaz Incident:  डोंबिवलीजवळच्या खोणी गावात नमाजवरून मोठा तणाव निर्माण झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dombivli News : हा प्रकार पोलिसांसमोरच घडल्याचा आरोप पीडित तरुणांनी केला आहे.
डोंबिवली:

Dombivli Namaz Incident:  डोंबिवलीजवळच्या खोणी गावात नमाजवरून मोठा तणाव निर्माण झाला आहे. नमाज पठणासाठी आलेल्या दोन मुस्लीम तरुणांना पोलिसांसमोरच मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीचा आरोप थेट शिवसेना (शिंदे गट) चे सरपंच हनुमान थोंबर आणि त्यांच्या समर्थकांवर आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मुस्लीम समाजाच्या नागरिकांनी थेट प्रशासनाला 'आमच्या सुरक्षिततेचे काय?' असा सवाल विचारला आहे.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी दुपारी नमाज पठण करण्यासाठी दोन तरुण खोणी परिसरातील मशिदीत जात होते. त्यावेळी त्यांना काही लोकांनी अडवले आणि त्यांच्यावर हल्ला केला. विशेष म्हणजे, हा प्रकार पोलिसांसमोरच घडल्याचा आरोप पीडित तरुणांनी केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अशा प्रकारच्या घटना घडत असूनही पोलीस कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप मुस्लीम नागरिकांनी केलाय.  

या घटनेनंतर पीडित व्यक्ती आणि समाजातील इतर लोक कल्याणचे DCP अतुल झेंडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर जमले होते. DCP कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. यावेळी मोहम्मद निहाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ही घटना नमाज पठणावरून घडली आहे. नमाजसाठी जात असताना रस्त्यालगत पार्किंगच्या सूचना देत असताना काही लोकांनी वाहनातून उतरून आम्हाला मारहाण केली. सय्यद मोहम्मद गौस यांनीही या घटनेचा निषेध करत, "आम्ही आमच्या धर्मानुसार प्रार्थना करायची नाही का? आमच्या सुरक्षिततेचे काय?" असा संतप्त सवाल केला.

( नक्की वाचा : Dombivli : डोंबिवली हादरले: नमाजासाठी आलेल्या तरुणांना पोलिसांसमोरच मारहाण; शिंदे गटाच्या सरपंचावर आरोप )
 

शिंदे गटाची प्रतिक्रिया काय?

या घटनेसंदर्भात शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी या प्रकरणातील संबंधिताला समज दिली जाईल आणि पुन्हा असा प्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले.

Advertisement

पोलीस आणि प्रशासनाने या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक मुस्लीम नागरिकांनी केलीय. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींवर योग्य ती कारवाई केल्यास भविष्यात अशा घटना टाळता येतील, असे त्यांचे म्हणणे आहे.
 

Topics mentioned in this article