शिवसेना आमदाराच्या बॉडीगार्डकडून भररस्त्यात मारहाण? आमदाराच्या खुलाशानं प्रकरणाला नवं वळण, Video

शिवसेना (एकनाथ शिंदे ) आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डनं भररस्त्यात एका व्यक्तीला मारहण केल्याचा व्हिडिओ सोशल माीडियावर व्हायरल झाला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

मेहबूब जमादार, प्रतिनिधी

शिवसेना (एकनाथ शिंदे ) आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डनं भररस्त्यात एका व्यक्तीला मारहण केल्याचा व्हिडिओ सोशल माीडियावर व्हायरल झाला आहे. 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या फेसबुक पेजवरही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या स्पष्टीकरणानं या संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

शिवसेना ठाकरे गटानं मारहणीचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी नेरळमध्ये भररस्तयात ही मारहाण झाल्याचा दावा केला होता. तसंच त्यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली होती. 

'महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही...  कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये!  कायदा-सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय!' असा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला होता.

( नक्की वाचा : Nagpur Hit and Run प्रकरणाला नवं वळण, CCTV फुटेजनंतर पोलिसांचे 2 मोठे खुलासे )

महेंद्र थोरवेंचं स्पष्टीकरण

शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी मारहण करणारी व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही, असा दावा केलाय. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, असं सांगत त्यांनी ज्याला मारहाण झाली ती व्यक्ती माझा नातेवाईक आहे, असा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. थोरवे यांनी या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटावर आरोप केले आहेत. 

'नेरळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये परवा जी मारहाणीची घटना घडली आहे त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. तो माझा बॉडीगार्डही नाही. मी सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर बातम्या पाहतोय त्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेलं आहे. तो माझा बॉडीगार्ड नाही. दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत. ज्याला मारहाण झाली तो माझा नातेवाईक आहे. 

ज्यांनी मारलं तो माझा बॉडीगार्ड नाही. ठाकरे गटाकडून जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे. त्यांनीच हे जाणीवपूर्वक केलं आहे. माझं ठाकरे गटाला जाहीर आव्हान आहे की ज्याला मारहाण झाली तो आमचा कार्यकर्ता आहे. तो आमचा नातेवाईक आहे. आम्हाला बदनाम करण्यासाठी ठाकरे गटानं रचलेलं हे षडयंत्र आहे,' असा दावा थोरवे यांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे.