उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये (Hathras in Uttar Pradesh) भोले बाबाच्या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा हकनाक बळी गेला. याशिवाय मोठ्या संख्येने भाविक रूग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणाबाबत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान चेंगराचेंगरीचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनुसार, सत्संगात मोठ्या संख्येने भाविक एकाच वेळी बाबाच्या चरणाची धूळ घेण्यासाठी पुढे आले होते. यानंतर एकच गोंधळ उडाला. बाबाला चरणस्पर्श करण्याच्या स्पर्धेतून चेंगराचेंगरी झाली. या अपघाताबद्दल झालेल्या तपासानुसार, एसडीएनने या सत्संग करणाऱ्या आयोजकांना परवानगी दिली होती. मात्र आयोजकांनी दिलेल्या नियमांचं पालन केलं नव्हतं. त्यामुळे आयोजकांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.
नक्की वाचा - भीषण दुर्घटना! सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 116 जणांचा मृत्यू
80 हजार भाविकांचा अपेक्षा, परंतू संख्या त्याहून जास्त...
या अपघाताच्या तपासानुसार, आयोजकांनी प्रशासनाला सांगितलं होतं की, या सत्संगात 80 हजारांच्या जवळपास लोक उपस्थित राहू शकतात. त्यामुळे प्रसासनाने त्यानुसार आयोजन करण्याची परवानगी दिली होती. मात्र तपासानुसार, त्यावेळी भाविकांची संख्या 80 हजारांहून खूप जास्त होती. काही वृत्तसंस्थांनुसार ही संख्या अडीच लाखांपर्यंत होती.
सत्संग संपल्यानंतर भोले बाबा निघाले होते. त्यावेळी पायाखालची धूळ घेण्यासाठी महिलांनी बाबाच्या दिशेने धाव घेतली. गर्दी हटवण्यासाठी तेथील प्रतिनिधींनी वॉटर कॅननचा उपयोग केला. त्यातून बचावासाठी जमावातील गोंधळ वाढला. गर्दी एकमेकांच्या अंगावर पाय ठेवून धावाधाव करू लागली.
FIR मध्ये भोले बाबाचं नाव नाही..
हाथरस चेंगराचेंगरीत पोलिसांनी 22 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मात्र या एफआयआरमध्ये भोले बाबाचं नाव नाही. या केसमध्ये मुख्य सेवादार देव प्रकाश आणि अन्य अज्ञात सेवा देणारे, आयोजन यांना आरोपी ठरवण्यात आली आहे. दरम्यान बाबा या घटनेनंतर अंडरग्राऊंड गेल्याचं सांगितलं जात आहे.