Jabalpur Sumit Murder Case: जबलपूरमधील सुमित काछी हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.आपल्या वैवाहिक आयुष्यात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नी जमुना उर्फ कविता हिने मंदिरच्या पुजाऱ्यासोबत मिळून हत्येचा कट रचला. 'प्रॉमिस डे'च्या दिवशी भावाच्या साखरपुड्याचे निमित्त साधून तिने पतीला मृत्यूच्या सापळ्यात ओढले. सुरूवातीला हे प्रकरण म्हणजे लुटमारीचे वाटत होते. पण जसा तपास झाला त्यातून हादरवून टाकणारी माहिती समोर आली.
सुमित याचं लग्न जमुना सोबत झालं होतं. तो तिला घेवून नेहमी नर्मदा तटावरील मंदिरात पूजेसाठी जात होता. त्याच वेळी त्यांची ओळख तिथला पुजारी असलेल्या सूर्यकांत त्रिपाठी याच्याशी झाली. घरगुती समस्या सोडवण्याच्या बहाण्याने सुरू झालेली ही ओळख पुढे अनैतिक संबंधांत बदलली. दोघे ही प्रेमात अखंड बुडाले. त्यांना प्रेमापुढे कसलेच भान राहीले नाही. मात्र या संबंधांची भनक पती सुमितला लागली होती. त्यातून त्याचे जमुनासोबत खटके उडू लागले.
अनैतिक संबंधात पती आड येत होता. अशा वेळी त्याचा काटा काढण्याचा कट जमुनाने प्रेमी पुजाऱ्या सोबत रचला. त्यासाठी तिने व्हॅलेंटाईन्स विक मधील प्रॉमिस डे निवडला. त्या दिवशी तिने पती सुमितकडून भावाला भेटण्याचे प्रॉमिस घेतले. सुमितने ही ते प्रॉमिस तिला दिले. त्यानुसार 11 फेब्रुवारी रोजी दुचाकीने ते भावाकडे जाण्यासाठी निघाले. साखरपुड्याला जाण्याचे नाटक करून जमुना पतीसोबत घराबाहेर पडली. वाटेत ती सतत पुजाऱ्याला लोकेशन पाठवत होती.
पुजारी सूर्यकांत आधीच बॅट घेऊन दबा धरून बसला होता. सुमित जवळ येताच त्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यात सुमित जखमी झाला. त्याच अवस्थेत त्याला बाजूच्या जंगलात नेण्यात आले. तिथे त्याच्यावर वार करण्यात आले. ज्यात जमुनानेही प्रेमी पुजाऱ्याला साथ दिली. हत्या केल्या नंतर जमुनाने लुटीचा बनाव रचला होता. पण पोलिसांनी संशयावरून जमुनाची चौकशी केली. तिचे कॉल डिटेल्स आणि चॅटने चेक केले गेले. त्यानंतर सर्व खूनाचा सर्व प्रकार उघडा झाला. भक्ती आणि विश्वासाच्या नात्याला या कृत्याने कलंक लावला आहे. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या असून, या प्रेमप्रकरणामुळे एक हसतं खेळतं कुटुंब उद्धवस्त झालं. या गुन्ह्यामुळे 2 वर्षांची चिमुरडी आता पोरकी झाली आहे.