Dombivli News : डोंबिवलीतील तलाठी कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर आली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. पण या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकला, तसे एक धक्कादायक आणि थरारक सत्य समोर आले. मंत्रालयात कंत्राटी शिपाई म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाला देशासाठी गुप्तपणे फायटर तयार करायचे होते... आणि याच एका स्वप्नामुळे त्याने सरकारी कार्यालय फोडले!
काय आहे प्रकरण?
डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोड परिसरात तलाठी कार्यालय आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळे कार्यालय बंद होते. याच काळात कार्यालयाचे कुलूप तोडून कोणीतरी आत शिरल्याचे लक्षात आले. हा प्रकार उघड झाल्यानंतर तलाठ्याने विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर त्यांना आढळले की, जुने कुलूप तोडून त्या जागी नवीन कुलूप लावण्यात आले होते. पोलिसांनी परिसरातील चावीवाल्यांचा शोध घेतला. एका चावीवाल्याच्या चौकशीतून पोलिसांना एक धागा मिळाला. चावीवाल्याने सांगितले की, त्याचा भाऊ त्या दिवशी कामावर होता आणि त्याने एका व्यक्तीला तलाठी कार्यालयाचे कुलूप बदलून दिले होते.
( नक्की वाचा : Panvel News : पनवेलमध्ये थरार, कोयत्याच्या धाकावर नातेवाईक ओलीस ठेवणारा सराईत गुन्हेगार जेरबंद )
त्यानुसार, पोलिसांनी चावीवाल्याच्या भावाकडे चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितले की, 'विक्रम प्रधान' नावाच्या तरुणाने मंत्रालयात कामाला असल्याचे ओळखपत्र दाखवून कुलूप उघडून देण्यास सांगितले होते. त्याने कुलूप बदलण्यासाठी त्याला ऑनलाइन 380 रुपये दिले होते. या डिजिटल व्यवहाराच्या आधारे पोलिसांनी विक्रम प्रधानला शोधून काढले आणि अटक केली.
चौकशीत धक्कादायक खुलासा
चौकशीदरम्यान विक्रमने पोलिसांना जी माहिती दिली, ती ऐकून पोलीसही थक्क झाले. विक्रमने सांगितले की, त्याला वाचनाची प्रचंड आवड आहे आणि त्याला देशाविषयी खूप प्रेम आहे. त्याला देशासाठी लढणारे 'फायटर' तयार करायचे आहेत. त्यांच्या प्रशिक्षणासाठी त्याला एका गुप्त जागेची गरज होती. डोंबिवलीत जागा शोधत असताना त्याला तलाठी कार्यालयाची जागा योग्य वाटली. तिथेच त्याला गोपनीय 'ग्राऊंड फायटर क्लब' सुरू करायचा होता, अशी कबुली त्याने दिली.
पोलिसांनी विक्रमला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला सुरुवातीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि त्यानंतर त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली.