संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी
Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एक सुन्न करणारी घटना घडली आहे. तालुक्यातील बावची आणि निंबोणी परिसरात एका 14 वर्षीय मुलीचा बालविवाह लावून देण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे लग्नानंतर केवळ 4 महिने संसार केल्यानंतर या अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत तिचं आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण मंगळवेढा परिसरात मोठी खळबळ उडाली असून बालविवाहाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
काय आहे प्रकरण?
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, संबंधित मुलीचे वय केवळ 13 वर्ष 9 महिने पूर्ण असताना तिचा विवाह लावून देण्यात आला होता. विवाहानंतर पुढील 4 महिने तिचा संसारही सुरू होता. मात्र याच काळात पती आणि सासरच्या मंडळींकडून या अल्पवयीन मुलीचा प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत होता.
सासरच्या लोकांकडून होणाऱ्या या सततच्या जाचाला कंटाळून अखेर या मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या वेळी या मुलीचे वय अवघे 14 वर्ष 2 महिने इतके होते. या प्रकरणी आता मुलीच्या पतीसह सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या मुलासोबत या मुलीचे लग्न लावून दिले होते, त्याचे वय देखील अवघे 19 वर्ष इतके आहे.
( नक्की वाचा : Nashik News : नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींचा धर्मांतरासाठी छळ; नमाजची सक्ती आणि बीफ खाण्याचा दबाव )
मंगळवेढा पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मृत मुलीचा पती आणि सासरे यांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे अल्पवयीन लग्न नक्की कुणाच्या मध्यस्थीने झाले, हे लग्न लावून देण्यासाठी कोणकोणते लोक सक्रिय होते आणि मुळात एवढ्या कमी वयात हे लग्न का लावले गेले, याचा सखोल तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. मात्र बालविवाह आणि त्यानंतर केवळ 4 महिन्यातच मुलीने केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |