घरात 10 दिवसावर लग्न होतं. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. आनंदाचे वातावरण होते. नातेवाईकही जमा झाले होते. अशा स्थितीत लग्न घरातल्या जावयाने असं काही केलं की त्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेलं आहे. ज्या मंडपात लग्न लागणार होते, त्याच मंडपात आता दशक्रीया विधी करावा लागणार आहे. लग्न घरात जावयाने आपल्या सासऱ्यालाच संपवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या रामहिंगणे गावात हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे जावयाने हे का केलं त्यामागचं कारण समोर येताच सर्व जण हादरले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बापूराव तुळशीराम मासाळ हे आपल्या कुटुंबासह रामहिंगणे गावात राहातात. त्यांचा मोठा मुलगा बाळकृष्ण मासाळ याचं सहा मे रोजी लग्न होणार होतं. घरात लग्नाची तयारी सुरू होती. लग्नाला काही दिवस शिल्लक असताना याच लग्न घरात भयंकर प्रकार घडला. बापूराव मासाळ यांचा जावई मंगेश सलगर याने बापूराव यांच्यावरच चाकू हल्ला केला. हा हल्ला त्याने फक्त सासऱ्यावरच नाही तर सासू आणि मेव्हण्यावर ही केला. या हल्ल्यात ते सर्व जण गंभीर जखमी झाले. तर सासरे बापूराव मासाळ यांचा मृत्यू झाला.
सासू आणि मेव्हाणा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूरमध्ये उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे हा हल्ला केल्यानंतर आरोपी जावई मंगेश सलगर याने पोलिसांना फोन केला होता. आपल्याला पाच ते सहा जणा मारत आहेत अशी तक्रार त्याने केली होती. शिवाय त्यांना स्वत:वर ही हल्ला करून घेत जखमी केले. त्यानंतर पोलिस घटना स्थळी आले. त्यांनी सासऱ्याचा मृतदेह पाहीला. जखमींना उपचारासाठी पाठवले. त्यानंतर मंगेश याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
त्यानंतर त्याच्या चौकशीत धक्कादायक खुलासा त्याने केला. गेल्या अडीच वर्षापासून त्याच्या पत्नीला नांदवायला पाठवलं जात नव्हतं. त्यामुळे तो चिडला होता. शिवाय कोर्टात पोटगीसाठी दावा केल्यामुळे त्याच्या मनात चिड निर्माण झाली होती. हे सर्व पत्नीचे कुटुंबीय करत असल्याचं त्याला वाटत होते. त्यातूनच त्याने मग सासू-सासरे आणि मेव्हणा यांच्यावर 27 एप्रिलला रात्री बारा वाजता चाकूने हल्ला. या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. रागाच्या भरात आपण हे कृत्य केल्याचे मंगेश याने मान्य केले आहे.