सौरभ वाघमारे, प्रतिनिधी
Solapur News : सोलापूरमध्ये एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे.महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या एका उमेदवाराची हत्या झाली आहे. अय्युब सय्यद असं त्यांचं नाव आहे. ते तृतीयपंथीय होते. अय्युब सय्यद हे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होते. त्यांनी प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती, मात्र त्यापूर्वीच त्यांचा घातपात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
निवडणुकीची तयारी आणि सोशल मीडियावरील लोकप्रियता
अय्युब सय्यद हे सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग 16 मधून नशीब आजमावणार होते. यासाठी त्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली होती. आपल्या प्रचाराचे व्हिडिओ आणि फोटो त्यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. त्यांच्या या पोस्टला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळत होते, ज्यावरून त्यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता दिसून येत होती.
एक तृतीयपंथी समुदायातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागले होते, परंतु या हत्येमुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला मोठा धक्का बसला आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुण्यात लोकशाहीचा 'आंदेकर' पॅटर्न: तुरुंगातून बाहेर आला आणि उमेदवारी अर्ज भरला, धक्कादायक Video )
CCTV मध्ये संशयास्पद हालचाल
या हत्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. लष्कर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, काल रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती अय्युब सय्यद यांच्या घरात प्रवेश करताना दिसून आल्या आहेत. हेच तीन संशयित मध्यरात्री 2 च्या सुमारास घराबाहेर पडताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. आज (शनिवार, 27 डिसेंबर) दुपारी ही मृत्यूची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या तिघांवर मुख्य संशय व्यक्त केला आहे.
पोलिसांकडून संशयित आरोपींचा शोध सुरू
भरवस्तीत झालेल्या या हत्येमुळे सोलापूर शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या त्या तीन अज्ञात व्यक्तींनीच अय्युब यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याचे गूढ अद्याप कायम आहे. राजकीय वैमनस्यातून ही घटना घडली की यामागे काही वैयक्तिक कारण आहे, याचा तपास सध्या पोलिसांच्या वतीने केला जात आहे.