सोनमनं केलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजाशी लग्न करण्याआधी सोनम स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचणार होती. मात्र सोनमचं ते प्लानिंग फसलं. राजाला मेघालयात मारण्याआधी त्याला तीन वेळा मारण्याचा प्रयत्न झाला. मात्र तोही फसला. सोनमचे धक्कादायक प्लान काय काय होते?
सुरुवातीला सोनमनं स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला होता. त्यानंतर राजाला मारण्याचा तीन ठिकाणी, तीन वेळा प्रयत्न केला होता. ऑपरेशन हनिमूनबद्दल पोलिसांचे धक्कादायक खुलासे केले आहेत. मेघालयातील एका अत्यंत साध्या रूममध्ये दोघेही राहिले होते. याचं नाव शिप्रा होम स्टे. होम स्टेच्या व्हिडिओनुसार दोघे आले... दोघांनी रात्रीचं जेवण केलं. दोघंही आनंदात होते. दोघांमध्ये कुठलं भांडण असेल, असं वाटलंही नव्हतं, असे शिप्रा होम स्टेचे मालक सांगतात.
सोनमचा स्वत:च्याच हत्येचा प्लान कसा फसला?
याच शिप्रा होम स्टेमधून राज आणि सोनम निघाले. आणि त्यानंतर सोनम आणि तिच्या साथीदारांनी राजाची हत्या केली. सोनमच्या वडिलांचा व्यवसाय आहे आणि त्याच व्यवसायामध्ये राज कुशवाह त्यांचा कर्मचारी होता. सोनम आणि राजचं एकमेकांवर प्रेम होतं. विशेष म्हणजे सोनम आणि राजच्या प्रेमप्रकरणाबद्दल सोनमच्या आईलाही माहीत होतं. माझं राजा रघुवंशीशी लग्न केलं तर मी काय करेन ते बघाच, अशी धमकीही सोनमनं आई वडिलांना दिली होती. तरीही कुटुंबीयांच्या दबावाखाली सोनमनं राजा रघुवंशीशी लग्न केलं. सोनम आणि राज कुशवाह यांचा सोनमच्या लग्नाआधीच पळून जाण्याचा प्लॅन होता. त्यासाठी सोनमनं स्वतःच्याच मृत्यूच्या बनावाचा दोन वेळा प्लॅन आखला होता. पण दोन्ही वेळेला प्लान यशस्वी झाला नाही.
नक्की वाचा - Sonam Raghuvanshi: 'बेवफा'सोनमला जेलमध्ये मिळणार 'या' सुविधा, टीव्ही, जेवण अजून बरच काही...
सोनम आणि राजचं लग्न मेमध्ये झालं. त्याआधी फेब्रुवारीमध्येच सोनमच्या मृत्यूचा बनाव रचण्याचा कट आखण्यात आला होता. सोनम अचानक गायब होणार, आणि ती नदीत वाहून गेल्याचं घरी सांगायचं असा एक प्लान होता. एका कुठल्या तरी रस्त्यावरच्या महिलेची हत्या करायची आणि मृतदेह ओळख पटणार नाही अशा रुपात सोनमच्या स्कूटीवर ठेऊन सोनमची हत्या झाल्याचं दाखवायचं, असा दुसरा प्लान होता. मात्र हे दोन्ही प्लान अयशस्वी झाले आणि अखेर ११ मे ला सोनम आणि राजाचं लग्न झालं.
सोनमचं लग्न होण्याआधी अकरा दिवस राजाच्या हत्येचं प्लॅनिंग करण्यात आलं. राजाच्या हत्येची मास्टरमाईंड सोनम होती. सोनम आणि राजा रघुवंशी मेघालयाला जाण्याआधी गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले. त्या दरम्यान सोनमनं तिचा प्रियकर राज कुशवाह आणि त्याचे मित्र विशाल सिंग, आनंद कुर्मी, आकाश राजपूत यांना गुवाहाटी आणि तिथून मेघालयात येण्यासाठी ५० हजार दिले. राजाची गुवाहाटीमध्येच हत्या करण्याचा प्लॅन होता.
सोनमला पोलिसांनी कुठे पकडलं?
गुवाहाटी, नांगरियात आणि मावलखियातमध्ये राजाला मारण्याचा प्लॅन होता, मत्र हे तीनही प्लॅन फसले. अखेर वैसेडोंगमध्ये सोनमच्या समोरच राजाची हत्या करण्यात आली. राजाची हत्या करुन त्याचा मृतदेह दरीत फेकण्यात आला. २३ मे ला दुपारी दोन ते सव्वा दोनच्या सुमाराला राजाची हत्या करण्यात आली. दोन वाजून अठरा मिनिटांनी चारही आरोपी हत्येच्या ठिकाणावनरुन निघून गेले.
राजाची हत्या केल्यानंतर सोनम टॅक्सीनं गुवाहाटीला गेली. त्यानंतर सिलिगुडी, पाटना आणि लखनऊमार्गे सोनम इंदूरला पोहोचली. २ जूनला ज्यावेळी राजाचा मृतदेह दरीत मिळाला, त्यावेळी सोनम इंदूरमध्येच होती. म्हणजे ज्यावेळी राजा आणि सोनमचे कुटुंबीय सोनम कुठे आहे म्हणून चिंतेत होते, त्यावेळी सोनम त्याच इंदूरमध्ये लपून बसली होती. सोनम २६ मे ते ८ जूनपर्यंत इंदूरमध्ये भाड्यानं घेतलेल्या एका खोलीत राहिली. त्यानंतर राज कुशवाहनं सोनमला इंदूरमधून पळून जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे सोनमनं इंदूर सोडलं आणि उत्तर प्रदेशातल्या गाजीपूरमध्ये गेली.
तुझं अपहरण झालं होतं, असा बनाव करत कुटुंबीयांना फोन कर, असं राजनं सोनमला सांगितलं होतं. मात्र त्याआधीच पोलीस सोनमपर्यंत पोहोचले आणि सोनमचं बिंग फुटलं. राजाला मारणारी सोनम सध्या मेघालय पोलिसांच्या ताब्यात आहे. राजा आणि सोनम मेघालयात ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे सोनमला नेऊन घटनेचं रिक्रिएशनही केलं जात आहे. ऑपरेशन हनिमून अंतर्गत पोलीस राजाच्या हत्येचा तपास करत आहेत. या ऑपरेशन हनिमूनमध्ये सोनम आता आणखी काय राज उघड करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे