बाबो! पुण्यातल्या लाचखोर ZP अधिकाऱ्यांकडून मोठं घबाड हाती, घराचं दार उघडताच पोलीस हादरले! 

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह तीन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेमध्ये लाचखोरीचं प्रकरण काही दिवसांपूर्वीच उघड झालं होतं. पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह तीन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले अदा करण्यासाठी लाच स्विकारताना या तिघांना रंगेहाथ अटक करण्यात आली.  या प्रकरणात 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. दरम्यान पुण्यातील या लाचखोर अभियंत्यांकडून मोठं घबाड हाती लागलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या पुणे जिल्हा परिषद (जिल्हा परिषद) च्या तीन अभियंत्यांपैकी दोघांच्या घरातून राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे युनिटने 1 कोटी 20 लाख रुपयांचे रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. दौंडमधील दोन रस्त्यांच्या बांधकामासाठी 40 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी सरकारी कंत्राटदाराकडून 1 लाख 40 हजार रुपयांची मागणी केल्याचा आणि स्वीकारल्याचा आरोप या तिघांवर आहे. विशेष न्यायालयाने तिन्ही अभियंत्यांना 16 मार्चपर्यंत कोठडीत पाठवले आहे. 13 मार्च रोजी सापळा रचण्यात आला आणि तिघांना लाच स्वीकारताना पकडण्यात आलं.

नक्की वाचा - Pune News : पैसे देण्यासाठी टक्केवारीची मागणी, 3 ZP अधिकाऱ्यांचा खेळ खल्लास

कोणाकडे काय काय सापडले? 

1) फुरसुंगी येथील कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग-दक्षिण) बाबुराव पवार (57) यांच्या निवासस्थानातून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 50 लाख रुपये जप्त केले. 

2) वानवडी येथील कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांच्या निवासस्थानातून 71 लाख रुपयांचे 33 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

3) पुण्यातील उपअभियंता दत्तात्रय पठारे यांच्या निवासस्थानीही झडती घेण्यात आली, परंतु कोणतीही रोकड आढळून आली नाही.