Sunjay Kapur Property Case : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या कुटुंबातील मालमत्तेचा वाद अधिकच चिघळला आहे. संजय कपूर यांची आई रानी कपूर यांनी त्यांची सून प्रिया कपूर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलाला ट्रस्टच्या नावाखाली फसवणुकीसाठी बहकावण्यात आले असून, मालमत्तेच्या व्यवहारात आपल्याला अंधारात ठेवल्याचा दावा त्यांनी केला आहे. या वादामुळे कपूर कुटुंबातील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला असून, कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रिया कपूर यांच्यावर गंभीर आरोप
80 वर्षांच्या वृद्ध रानी कपूर यांनी आपली सून प्रिया कपूर आणि इतर 8 जणांविरुद्ध फसवणुकीचा नवीन खटला दाखल केला आहे. रानी कपूर यांच्या मते, त्यांच्या नावावर आरके फॅमिली ट्रस्ट किंवा रानी कपूर फॅमिली ट्रस्ट नावाचा जो न्यास स्थापन करण्यात आला आहे, तो पूर्णपणे फसवणूक करून बनवण्यात आला आहे.
या ट्रस्टच्या माध्यमातून संजय कपूर यांची हजारो कोटी रुपयांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या वादात संजय कपूर यांची माजी पत्नी आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या मुलांनीही यापूर्वीच प्रिया कपूर यांना न्यायालयात खेचले आहे.
( नक्की वाचा : Sunjay Kapur Property : 'त्या' रात्री प्रिया कपूर कुठे होत्या? कॉल रेकॉर्ड्समुळे 3000 कोटींच्या लढाईत ट्विस्ट )
खात्यांचा तपशील देण्याची मागणी
रानी कपूर यांनी न्यायालयात विनंती केली आहे की, त्यांच्या नावावर असलेला हा आरके ट्रस्ट बेकायदेशीर घोषित करण्यात यावा. तसेच, या ट्रस्टचा कोणताही वापर करण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ट्रस्टच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या सर्व बँक खात्यांचा आणि व्यवहारांचा सविस्तर तपशील सादर करावा, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे. रानी कपूर यांनी स्पष्ट केले की, त्या कुटुंबाच्या प्रमुख आहेत आणि त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर सर्व संपत्ती त्यांच्या मालकीची आहे, ज्यामध्ये कोणालाही अशा प्रकारे फेरफार करण्याचा अधिकार नाही.
रानी कपूर यांनी त्यांच्या अर्जात पती डॉ. सुरिंदर कपूर यांच्या मृत्यूपत्राचा उल्लेख केला आहे. 30 जून 2015 रोजी त्यांचे निधन झाले होते. त्यांनी 6 फेब्रुवारी 2013 रोजी केलेल्या त्यांच्या मृत्यूपत्राला र्व कंपन्यांचे शेअर्स, तसेच सर्व जंगम आणि स्थावर मालमत्ता पत्नी रानी कपूर यांच्या नावावर केली होती.
( नक्की वाचा : Property Dispute: कुटुंबात संपत्तीवरून वाद नकोय? संजय कपूर वादातून प्रत्येकाने शिकायला हवेत 'हे' 5 नियम )
या मृत्यूपत्राला मुंबई उच्च न्यायालयाने रीतसर प्रमाणित केले आहे. त्यामुळे या मालमत्तेवर आपलाच पूर्ण अधिकार असल्याचे रानी कपूर यांचे म्हणणे आहे. या प्रकरणावर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे.
प्रिया कपूर यांचे प्रत्यारोप
दुसरीकडे, प्रिया कपूर यांनीही शांत न बसता आपली ननद मंदिरा यांच्याविरोधात पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली आहे. मंदिरा या पॉडकास्ट, सोशल मीडिया आणि विविध मुलाखतींच्या माध्यमातून आपली नाहक बदनामी करत असल्याचा आरोप प्रिया यांनी केला आहे.
आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी जाणीवपूर्वक खोटे आरोप केले जात असल्याचे सांगत त्यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. प्रिया यांच्या विनंतीवरून या प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत सुरू असून, त्यात त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. यामुळे कपूर कुटुंबातील हा वाद आता आई, सून आणि मुलगी अशा तिहेरी संघर्षात अडकला आहे.