Supreme Court News : सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी (15 मे 2025) एक वेगळेच दृश्य दिसलं. रुवारी दुपारच्या सुमारास न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पीडित महिला आणि दोषी यांनी एकमेकांना फुलं दिली. न्यायालयात टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वोच्च न्यायालयाने विवाह करण्याची परवानगी देत दोषीची शिक्षा निलंबित केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर हा सर्व प्रकार घडला. तक्रारदार महिला आणि लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या दोषी दोघांनीही लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर खंडपीठाने जोडप्याला कोर्टरूममध्ये फुलांची देवाणघेवाण करण्यास सांगितलं.
न्यायालयाने दोषी व्यक्तीला महिलेला प्रपोज करण्याचे निर्देश देण्यापूर्वी सांगितलं की, ‘आम्ही लंच सत्रात दोन्ही पक्षांशी भेटलो. दोन्ही पक्षांनी एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.' न्यायालयाने व्यक्तीची शिक्षा निलंबित करताना म्हटलं की, ‘ते दोघेही एकमेकांशी लग्न करण्यासाठी तयार आहेत. लग्नाची माहिती संबंधित पालकांकडून निश्चित केली जाईल. आम्हाला आशा आहे की लग्न लवकरच होईल. या परिस्थितीत आम्ही शिक्षेला स्थगिती देत आहोत आणि दोषीला सोडत आहोत.'
( नक्की वाचा : प्रसिद्ध शाळेच्या CEO कडून शाळेत अश्लील कृत्य! पालकांना मिळाला Video )
आज याचिकाकर्ता 6/5/2025 च्या निर्देशानुसार या न्यायालयात हजर झाला. त्याला परत तुरुंगात पाठवलं जाईल आणि लवकरच संबंधित सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. संबंधित सत्र न्यायालयाला योग्य वाटलं तर दोषीला जामीन मिळेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 जुलै रोजी होणार आहे.
काय होता खटला?
दोषी व्यक्तीनं 2016 ते 2021 दरम्यान पीडित महिलेला लग्नाचं खोटं वचन देऊन वारंवार बलात्कार केल्याचा हा खटला होता. पीडितेच्या वतीने वकील निखिल जैन यांनी बाजू मांडली. दोषी व्यक्तीने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने 5 सप्टेंबर 2024 रोजी दिलेल्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामध्ये त्याच्या शिक्षेच्या निलंबनाचा अर्ज फेटाळण्यात आला होता.
फेसबुकच्या माध्यमातून झाली होती महिलेशी मैत्री
या प्रकरणात दाखल झालेल्या FIR नुसार, व्यक्तीची महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. ती त्याच्या बहिणीची मैत्रीण होती. त्यांच्यात मैत्री झाली आणि अनेकवेळा त्यांच्यात शारीरिक संबंध आले. दोषी व्यक्तीनं प्रत्येक वेळी पीडितेला लग्नाचं आश्वासन दिलं, अला आरोप आहे. अखेर आई तयार नसल्याचं कारण देत त्यानं लग्नाला नकार दिला. . सप्टेंबर 2014 मध्ये सत्र न्यायालयानं त्याला बलात्कार आणि फसवणुकीच्या आरोपाखाली दोषी ठरवलं. त्याला कलम ३७६(२)(एन) अंतर्गत वारंवार बलात्कार केल्याबद्दल 10 वर्षांचा आणि कलम ४१७ IPC अंतर्गत फसवणुकीसाठी 2 वर्षांचा कठोर कारावास ठोठावण्यात आला. उच्च न्यायालयातून दिलासा न मिळाल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.