गुजरात: भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्याने आत्महत्या केल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे. दीपिका पटेल असे या आत्महत्या केलेल्या महिला नेत्याचे नाव असून या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुजरातमधील सुरतमध्ये भाजपच्या एका महिला नेत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपिका पटेल या सुरत भाजपा महानगरमधील प्रभाग 30 च्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आपले आयुष्य संपवले. त्या भारतीय जनता पक्षामध्ये सक्रियपणे काम करत होत्या तसेच घरी असणारी शेतीही पाहत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्याआधी त्यांनी सुरत महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक चिराग सोलंकी यांना शेवटचा फोन केल्याचीही माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
नक्की वाचा: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार! हजारो आंदोलक दिल्लीत धडकणार; संसदेला घेराव घालणार
चिराग सोलंकी याला फोन केल्यानंतर त्यांनी मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर चिराग सोलंकी दीपिका पटेल यांच्या घरी पोहोचले मात्र त्याआधी त्यांनी आत्महत्या केली होती. घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चिराग सोलंकी हे घरी आल्याचे स्पष्ट झाले आहे. कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसांनी भाजप नगरसेवक चिराग सोलंकी यांची तीन तास चौकशी केली. पोलिसांकडून निष्पक्ष तपास करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
या घटनेनंतर दीपिका पटेल यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत. दीपिका पटेल यांना कोणी ब्लॅकमेल करत असल्याची भीती व्यक्त करत याच कारणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी डीसीपी (झोन-4) विजय सिंह गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी फाशीमुळे मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. याबाबतचा अधिक तपास सध्या सुरु आहे.