उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये मर्चेंट नेव्ही अधिकारी अनुराग सिंग यांच्या पत्नी मधु सिंग यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. मधुच्या कुटुंबीयांनी या घटनेला आत्महत्या नसून सुनियोजित हत्या असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी अनुरागवर हुंड्यासाठी छळ, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप लावला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
अनुरागचे वर्तन विकृत
मधुची मोठी बहीण प्रियाने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अनुरागचे वर्तन हिंसक आणि विकृत होते. "तो लहान-सहान गोष्टींवरून मधुला मारहाण करायचा. अगदी प्लेट इकडे-तिकडे ठेवली तरी मारायचा. तो जबरदस्तीने तिला दारू पाजायचा. त्याच बरोबर मधुला त्याने तिच्या मित्र-मैत्रिणी व कुटुंबापासून पूर्णपणे दूर केले होते असा आरोप केला आहे.
लग्नाच्या 15 दिवसांनंतरच मारहाण
मधु आणि अनुरागचे लग्न याच वर्षी 25 फेब्रुवारी रोजी झाले होते. मात्र, लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांतच मधुसोबत मारहाण सुरू झाली. 10 मार्चला झालेल्या मारहाणीनंतर मधु माहेरी परतली होती. तिने रडत रडत बहिणीला सर्व काही सांगितले होते. कुटुंबीयांच्या मते, हे लग्न मॅट्रिमोनियल साईटद्वारे ठरले होते. लग्नावेळी अनुरागने 15 लाख रुपये रोख आणि इतर महागड्या वस्तूंची मागणी केली होती. मधुच्या वडिलांनी आपल्या ऐपतीनुसार खर्च केला होता. पण अनुरागच्या मागण्या संपल्या नाहीत. त्यामुळे तो मधुला सतत टोमणे मारत होता.
Heart Attack: जीममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
घटनेच्या रात्री ही झाली भांडणं
सोसायटीच्या सुरक्षा रक्षकानुसार, रविवारी रात्री 10:30 वाजता दोघेही भांडत भांडत घरी आले होते. सार्वजनिक ठिकाणीही त्यांच्यात अनेकदा वाद होत असल्याचं अनेक जण सांगतात. अनुरागने रात्री 12 वाजता पोलिसांना घटनेची माहिती दिली. पण मधुच्या कुटुंबीयांना 5 तासांनंतर याची माहिती मिळाली. अनुरागने आधी सुरक्षा रक्षकाला मधुने आत्महत्या केल्याचे सांगितले. नंतर स्वतःच मृतदेह फासावरून खाली उतरवला. मधुच्या कुटुंबीयांनी सांगितले की, घटनेच्या आधी अनुरागने घरकाम करणाऱ्याला मेसेज करून दुसऱ्या दिवशी न येण्यास सांगितले होते. त्याच रात्री 10:30 वाजता त्याने ऑनलाइन फूड ऑर्डर केले होते. ज्यामुळे संशय आणखी वाढतो.
एक्स गर्लफ्रेंडसोबत वाढली होती जवळीक
मधुने तिच्या बहिणीला सांगितले होते की, अनुराग त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये भेटला होता. जेव्हा मधुने यावर प्रश्न विचारला, तेव्हा अनुरागने उलट तिच्यावरच संशय घेतल्याचा आरोप केला. मधुने अनुरागच्या चॅटचे स्क्रीनशॉट पुरावे म्हणून तिच्या कुटुंबीयांना पाठवले होते. मधुच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, लग्नाआधी मधु आनंदी मुलगी होती. पण लग्नानंतर तिचे जीवन बदलले. अनुरागने तिचे सामाजिक आयुष्य संपवले होते. ती कोणाशीही बोलल्यावर तो भांडण करायचा असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केली.
पोलीस ठाण्यात सिगारेटची मागणी करत होता आरोपी
पोलिसांच्या चौकशीत अनुरागने स्वतःला निर्दोष सांगितले. पण आत्महत्येमागे कोणतेही ठोस कारण देऊ शकला नाही. पोलीस ठाण्यात तो सतत सिगारेटची मागणी करत होता. त्याच्या या वर्तनामुळेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.