
सुरज कसबे, पिंपरी-चिंचवड
Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरातून एक अतिशय दु:खद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. नियमित व्यायाम करून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 37 वर्षीय तरुणाचा जीममध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मिलिंद कुलकर्णी असे या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद कुलकर्णी हे गेल्या सहा महिन्यांपासून चिंचवड गावात असलेल्या एका जीममध्ये जात होते. ते नियमितपणे नसले तरी अधूनमधून व्यायाम करत होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी जीममध्ये व्यायाम केला. त्यानंतर ते एका ठिकाणी बसले आणि त्यांनी पाणी प्यायले. मात्र, काही सेकंदांतच त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले.
(नक्की वाचा- Heart Attack अचानक येत नाही; तज्ज्ञांनी सांगितले धोक्याचे संकेत, या लक्षणांवर लक्ष ठेवा)
या प्रकारानंतर जीममधील इतर लोकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मिलिंद कुलकर्णी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मिलिंद कुलकर्णी यांच्या पत्नी स्वतः एक डॉक्टर आहेत. आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्राची संपूर्ण माहिती असतानाही त्यांच्या पतीवर अशी वेळ आल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूचे वाढते प्रमाण ही एक गंभीर समस्या बनली आहे.
(नक्की वाचा- Jalgaon News: शाळेतच झाला विद्यार्थ्याचा Heart Attack नं मृत्यू! धक्कादायक घटनेनं सर्वच हादरले)
तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्यापूर्वी पूर्ण आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य काळजी आणि तपासणी करूनच कोणताही व्यायाम करावा, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world