राहुल कुलकर्णी, पुणे: पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे घटनेनंतर अनेक बसेसमध्ये कंडोम, साड्या, बेटशीट, अंतवस्त्रेही सापडली. त्यामुळे स्वारगेट स्थानकात चाललंय काय? असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच स्वारगेट स्थानकात सुरु असलेल्या धंद्यांची कुंडलीच आता समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्वारगेट स्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी स्थानक परिसरातील विक्रेते, दुकानदार यांच्याशी संवाद साधला. यावेळी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दुकानदार असलेले सुरेस तानपुरे यांनी स्वारगेट डेपो आगारात घडणाऱ्या काळ्या धंद्यांची यादीच मांडली.
सुरेश तनपुरे गेली 40 वर्षे या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय करतात. त्यांचे येथे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दुकान आहे. तनपुरे यांनी एनडीटीवीच्या टीमला दाखवले की, कुठे आणि कशा प्रकारे अवैध धंदा सुरू आहे. किती गांजा, किती दारू येथे मिळते, यासाठी कोणते सुरक्षारक्षक किती हप्ते घेतात. एसटी महामंडळाचे अधिकारी दुकानदारांकडून फळे कशी फुकट घेतात.
या ठिकाणी बलात्काराचा गुन्हा करणारा आरोपी दत्तात्रय गाडे तब्बल नऊ दिवस टोळक्यासोबत गांजा आणि दारू पिऊन बसलेला होता. हे टोळके अस्तित्वात असल्याची माहिती तनपुरेंनी तब्बल बारा वेळा पोलिसांना लेखी स्वरूपात दिली होती. तसेच, संपूर्ण अवैध धंद्याची माहितीही त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना दिली होती. गेल्या महिन्यात, 10 डिसेंबर रोजी त्यांनी ही माहिती पोलिसांना पुरवली होती.
आगारामध्ये 6- 7 फिरस्त्या विक्रेत्यांची टोळी असून त्यांनी टवाळखोर लोकांना सोबत घेऊन गँग तयार केली आहे. हे टोळके स्थानकामध्ये तंबाखु, गुटखा सिगारेट असे नशेचे पदार्थ विकतात. तसेच बसस्थानकात छोट्या मोठ्या चोऱ्या, दारुचे, पत्त्यांचे अड्डे त्यांनी बनवले होते. या टोळक्याने सुरेश तनपुरे यांच्या दुकानावर हल्ला करत दगडफेक केली तसेच मॅनेजरलाही मारहाण केली होती.
दरम्यान, सुरेश तनपुरे यांनी दिलेल्या याबाबतची सविस्तर तक्रार पुणे आयुक्तांकडे केली होती. मात्र पुणे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे हा बलात्कार टाळता आला असता. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच तो टळला नाही, असे म्हणावे लागेल.