India's Most Wanted Criminals: गेल्या 17 वर्षांपासून सुरु असलेलं 'ऑपरेशन तहव्वूर' आता पूर्ण झालं आहे. मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा गुन्हेगार भारताच्या ताब्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूरला भारताला सोपवणार असल्याचं जाहीर केलं होतं. अर्थात हे अचानक झालेलं नाही. भारतानं यासाठी सातत्यानं अमेरिकेवर दबाव टाकला होता. अखेर अमेरिकेला भारताची मागणी मान्य करावी लागली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तहव्वूर राणा प्रत्यार्पणानंतर आता भारताच्या ताब्यात आहे आता भारताच्या कायद्याप्रमाणे पुढची प्रक्रिया चालवली जाईल जेव्हा गुन्हेगारांचं प्रत्यार्पण झालं असतं त्यावेळी ज्या देशातून प्रत्यार्पण झालंय, त्या देशामध्ये सर्वोच्च शिक्षा काय आहे, आणि करारामध्ये काय ठरलंय, याचा विचार करावा लागतो. अमेरिकेत फाशीची शिक्षा अस्तित्वात आहे.... त्यामुळे तहव्वूर राणाला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते.
प्रत्यार्पित आरोपींच्या शिक्षेबद्दल नेमकी काय भानगड असते ?
अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचं पोर्तुगालमधून प्रत्यार्पण झालं. मात्र पोर्तुगालमध्ये फाशीची शिक्षा नाही. त्यामुळे अबू सालेमला डेथ पेनल्टी म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात येवू नये, अशी अट पोर्तुगालनं अबू सालेमच्या प्रत्यार्पणावेळी ठेवली होती. त्यामुळेच बॉम्बस्फोटातला आरोपी असलेला अबू सालेम अजूनही तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय.
( नक्की वाचा : Tahawwur Rana: तहव्वूर राणा भारतात येण्याआधीच पाकिस्तानची झोप उडाली, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं..)
मात्र अमेरिकेमध्ये गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली जाते त्यामुळे तहव्वूर राणाला फाशीची शिक्षा देणं शक्य आहे.
अबू सालेमला फाशीची शिक्षा देता येईल का, याबद्दल एटीएसचे माजी प्रमुख के. पी. रघुवंशी यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी रघुवंशी म्हणाले की, वेगवेगळ्या देशांचे एकमेकांशी वेगवेगळे करार असतात. ज्या देशात गुन्हेगार पकडला गेला आहे आणि ज्या देशानं त्याला ताब्यात देण्याची मागणी केलीय.. त्यामध्ये पकडणाऱ्या देशात काही काही कायदेशीर अडचणी नसतील तर ज्या देशात गुन्हा केलाय त्या देशानुसार त्याला शिक्षा दिली जाते.
तहव्वूर राणा भारतात आला म्हणजे 26/11 हल्ल्याचा न्याय झाला, असं मुळीच नाही. तर आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचाय.. असे अनेक तहव्वूर अजून बाकी आहेत.हाफिज मुहम्मद सईद हा 26/11 हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे...तर जकी-उर-रहमान लखवी हा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आहे. लखवीनं अनेक दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलंय...
साजिद मीर हा 26/11 हल्ल्याचा मुख्य हँडलर आहे. तो कराचीमधून मुंबईत आलेल्या दहशतवाद्यांना आदेश देत होतातर मेजर इकबाल हा ISIचा अधिकारी आहे. तो हल्ल्याचा हँडलर साजिद मीरसोबत काम करायचा आणि पाक लष्कराबरोबर संवाद साधत असे.
देशाच्या या सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा होणं अजून बाकी आहे. आता पुढचा काही काळ तहव्वूर राणावर न्यायालयीन प्रक्रिया चालेल....त्यानंतर भारतामध्ये राणावरचे आरोप सिद्ध झाले की त्याच्या शिक्षेचा फैसला होईल. या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा सगळ्यांनाच आहे.